
बेळगाव : मच्छे येथील रहिवासी चैत्राली संदीप वागोजी यांची बुधवार दिनांक 15-04-2026 रोजी उद्यमबाग ते पिरणवाडी दरम्यान बस प्रवास करत असताना पर्स हरवली होती.
सदर बस वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बेळगाव येथील दुसऱ्या डेपोतील अनुसूची क्रमांक १०८ (सी.बी.टी – तीर्थकुंडे मार्ग) वर धावत होती. या बसमध्ये कर्तव्य बजावत असलेले बस वाहक श्री. सिद्धप्पा हडलगी (बिल्ला क्रमांक ५४५४) व चालक श्री. शिवानंद एस (चालक क्रमांक ४२५) यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.
बस सीबीटी येथे पोहोचल्यावर त्यांना संबंधित पर्स आढळून आली. त्यांनी तत्काळ संपर्क साधून संबंधित व्यक्तीस बोलावले व पर्स सुपूर्द केली. त्या पर्समध्ये सुमारे ७३८० रुपये रोख रक्कम, सोन्याचा नथ, कानातले तसेच मोबाईल असा मौल्यवान ऐवज होता.
या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वर्तनाबद्दल बस वाहक श्री. सिद्धप्पा हडलगी व चालक श्री. शिवानंद एस यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी दाखवलेली प्रामाणिकता ही समाजासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta