
बेळगाव : अलिकडे शेतकरी शेतीच्या कामासाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात जरी करत असलातरी पेरणीपूर्व म्हणजे खरीप हंगामाच्या सुरवातीला बैलांच्या साह्याने मशागत करावीच लागते. मान्सून दाखल होण्यापूर्वी म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस शेतकरी वर्ग सर्रास आपले शेताच्या मशागतीत गुंतलेला असतो पण यावर्षी अवकाळी पावसाने जोरदार दणका दिल्याने परिणामी शेतीची अंतिम टप्प्यातील कामं खोळंबली त्यातच मान्सून जोरदार मुसंडी मारत असल्याचा हवामान खात्याच्या इशाराने बळीराजाच्या चिंतेत अधिकच भर पडली. पण पावसाने कालपासून उघडीप दिल्याने चलवेनहट्टी, अगसगे, हंदिगनूर, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी, बोडकेनट्टी या भागातील शेतकरी वर्ग झापटून कामला लागला असून मान्सून दाखल होण्यापूर्वी आपले शेत पेरणीसाठी तयार करण्यात गुंतला आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी केलेले जमिनीचे सपाटीकरण करणे, बांधावर माती टाकणे, कुळवणी, शेणखत विसकटणे आदी कामे खोळंबली होती पण पावसाच्या उघडपीमुळे शेतकरी वर्गाला थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसाने जोरदार दणका दिलाने आणी जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाल्याने शेतीची कामे चांगल्या प्रकारे होत आहेत तसेच मे महिन्याच्या अखेरीस विहिरी तसेच कूपनलिका तळ गाठत असतात त्यामुळे ऊस पिकासह तरकारी पिकांना पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासला जात होतो. पण अवकाळी पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे तसेच पावसाने किमान पंधरा दिवस उघडीप द्यावी, असे मत व्यक्त शेतकरी वर्गातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta