अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या थरारक सामन्यात पंजाब किंग्सने 204 धावांचे लक्ष्य केवळ 19 षटकांतच पूर्ण करत 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा यंदाचा प्रवास येथेच संपला असून, पंजाब किंग्स 3 जूनला अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूशी भिडणार आहे.
अय्यरची संयमित पण स्फोटक खेळी
पंजाबसाठी सामन्याचा नायक ठरला कर्णधार श्रेयस अय्यर. त्याने 41 चेंडूंमध्ये नाबाद 87 धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेत निर्णायक भूमिका बजावली.
वढेरा-अय्यरची जबरदस्त भागीदारी
पंजाबची सुरुवात काहीशी डळमळीत झाली होती. प्रभसिमरन सिंह केवळ 6 धावांवर बाद झाला, तर प्रियांश आर्य 20 धावांवर माघारी परतला. मात्र, जोश इंग्लिशने 38 धावांची झंझावती खेळी करत डावाला गती दिली. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांच्यात पाचव्या विकेटसाठी झालेली 84 धावांची भागीदारी (47 चेंडूंत) सामना पंजाबच्या बाजूने झुकवणारी ठरली. वढेरानेही मोठ्या मंचावर 29 चेंडूंत 48 धावांची महत्त्वाची खेळी केली.
ऐतिहासिक अंतिम सामना : नवा विजेता निश्चित
या विजयासह पंजाब किंग्स आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पोहोचली असून, 3 जून रोजी ती रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूशी भिडणार आहे. विशेष म्हणजे, आजवर या दोन्ही संघांनी एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा एका नव्या विजेत्याचा उदय होणार हे निश्चित आहे.