
बेळगाव : बेळगाव पोलिस आयुक्तालय व्याप्तीअंतर्गत एक विशेष “अँटी स्टॅबिंग स्क्वाड” पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. बेळगाव शहर परिसरात अलीकडे क्षुल्लक कारणावरून हाणामारीच्या अनेक घटना घडत आहेत. नुकताच मध्यवर्ती बस स्थानकावर एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर क्षुल्लक कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पोलीस आयुक्तालय व्याप्तीअंतर्गत एका विशेष “अँटी स्टॅबिंग स्क्वाड”ची स्थापना केली आहे. या पथकाने काकती, हिरेबागेवाडी, टिळकवाडी, उद्यमबाग, मार्केट पोलीस स्थानक, खडे बाजार पोलीस स्थानक, माळमारुती पोलीस स्थानक व्याप्तीत कारवाईला प्रारंभ केला असून या कारवाईत न्यू गांधीनगर येथील एका युवकाला अटक करण्यात आली असून त्याच्या गाडीत जांबिया पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बेळगाव शहराचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली या पथकातील अधिकारी व पोलिसांनी काल मध्यवर्ती बसस्थानक त्याचबरोबर शहरातील विविध प्रमुख ठिकाणी तपास मोहीम राबवली व युवक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. यावेळी या पथकातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आपल्यासोबत शस्त्रे बाळगणे कसे चुकीचे आहे याबाबत मार्गदर्शन केले व बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्यास शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला. या कारवाई दरम्यान न्यू गांधीनगर येथील युवकाला अटक करण्यात आली असून अटक केलेल्या युवकाचे नाव अप्सर अब्दुल रशीद शेख (वय 42) असे आहे. गांधीनगर जवळील उड्डाण पुलाखाली तपासणी करताना दुचाकीच्या डिक्कीत जांबिया आढळून आला. अप्सर शेख याला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta