

बेळगाव : आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेकजण परोपकार करत असतात. पण आपलं दुःख विसरून दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालणारे अवलिया खूप कमी असतात. असाच एक अवलिया म्हणजे नाझर कॅम्प वडगाव येथील अभियंते ज्ञानेश्वर सायनेकर असे म्हटले जाते की दुसऱ्याच्या दुःखाला सुखाचा अस्तर लावले की आपल्या दुःखाची धार कमी होते याच उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वर सायनेकर यांनी व कुटुंबियांनी आपल्या आईच्या बाराव्याच्या निमित्ताने कौतुकास्पद उपक्रम राबविला.

नाझर कॅम्प वडगाव येथील रहिवासी रुक्मिणी सायनेकर यांचे 16 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या बाराव्या दिनी त्यांचे चिरंजीव व कुटुंबीयांनी समाजातील गरजूंना संसार उपयोगी साहित्य देत आपल्या आईला आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. सायनेकर कुटुंबीयांनी सेंट जोसेफ वृद्धाश्रम कॅम्प, किल्ला तलाव येथील पाथरवट समाज त्याचप्रमाणे पिरनवाडी भागातील गरजू निराधार कुटुंबांना साड्या, चादरी, ब्लॅंकेट इत्यादी साहित्य वाटप करून त्यांना मदतीचा हात दिला. सायनेकर कुटुंबीयांच्या या उपक्रमामुळे या निराधार लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. यावेळी कै. रुक्मिणी सायनेकर यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर सायनेकर त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सायनेकर कुटुंबीयांनी राबविलेल्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta