खानापूर : रात्रीच्या सुमारास मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या त्रिकुटापैकी एक चोरटा हाती लागला.
प्रज्वल प्रकाश वागळेकर (वय 21) रा. बरगाव, तालुका खानापूर असे हाती लागलेल्या संशयीत चोरट्याचे नाव असून हातातून निसटलेली जोडगोळीही बरगावचीच असल्याचे समजते.
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी रोडवरील बरगाव जवळ असलेल्या के. पी. पाटील नगरातील साई मंदिरातील दानपेटी रात्री एकच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. याचवेळी आपल्या घराच्या कामासाठी येणाऱ्या साहित्याची वाट पाहत के. पी. पाटील हे मंदिरामागे उभ्या केलेल्या आपल्या चाकी वाहनात बसून होते.
दरम्यान चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून शटर तोडले व आत जाऊन दानपेटी तोडण्याचा प्रयत्न चालविला होता. रात्रीच्या वेळी मंदिरातून येणारा आवाज ऐकून के. पी. पाटील मंदिराकडे गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात चोरट्यांचा कारनामा आला. त्यांनी मंदिरकडे जाऊन डोकावून पाहिले असता चोरट्यानी तेथून धूम ठोकली. अंधाराचा फायदा घेऊन त्रिकुटापैकी दोघे जण तेथून निसटले. पण एकजण टप्प्यात आला. के. पी. पाटील यांनी कमरेला लावलेली रिवाल्वर काढून, पळालास तर गोळी झाडतो असे म्हणताच तो चोरटा तेथेच थांबला. त्याला रंगेहात पकडून मंदिरात डांबून ठेवण्यात आले. आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोबारा केलेल्या दोन चोरट्यांचा तपास पोलिसांनी हाती घेतला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta