Friday , November 22 2024
Breaking News

12 जूनपासून गोव्यात दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन!’

Spread the love

यंदाच्या हिंदु अधिवेशनाचे वैशिष्ट्य- ‘हिंदु राष्ट्र संसद’!
कोल्हापूर : गोवा येथे गेल्या 10 वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले. या 10 व्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा?’, याविषयी दिशादर्शन करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसदे’चे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनातील तीन दिवस ‘हिंदु राष्ट्र संसद’ घेतली जाणार आहे. त्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि संवैधानिक मार्ग’, ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ आणि ‘हिंदु शैक्षणिक धोरणांचा अवलंब कसा करावा?’ या विषयांवर तज्ञ मान्यवरांकडून विस्तृत चर्चा होणार आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा 12 ते 18 जून 2022 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेसाठी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी उपस्थित होते.
श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, “नुकतेच ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी ‘समान नागरी कायद्याच्या आधारे शरीयतमध्ये हस्तक्षेप चालणार नाही. हिंदूंना मुसलमान आवडत नसतील, तर हिंदूंनी भारत सोडून निघून जावे’, असे उघडपणे धमकावले आहे. मुसलमानांनी धमकावून काश्मीरमधून हिंदूंना बाहेर काढले, आता उर्वरित भारतातून बाहेर काढण्याची त्यांची ही धमकी आहे. एकीकडे ‘आम्ही पाकिस्तानात गेलो नाही’, असे अभिमानाने सांगायचे आणि दुसरीकडे भारतीय संविधानाच्या आधारे बनलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी इस्लामची ढाल पुढे करायची, हे यापुढे चालणार नाही. मुसलमान पाकिस्तानात न जाता भारतात राहिले, हा त्यांनी भारतावर केलेला उपकार नाही! आज पाकिस्तानात गेलेल्यांची स्थिती काय आहे, हे त्यांनी पहावे. भारतातील बहुसंख्य हिंदूंनी मुसलमानांना अल्पसंख्यांकांच्या विशेष सवलती देऊनही बंधुभाव जोपासला आहे, हे लक्षात घ्यावे. आताचा भारत गांधीगिरी करणारा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून स्वराज्यरक्षण करणारा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.”
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, “कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकले नाही. वर्ष 2020 मध्ये ‘ऑनलाईन’ अधिवेशन घेण्यात आले. या वर्षी प्रत्यक्ष अधिवेशन होत असल्यामुळे देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील 26 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1000 पेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने ‘काशी येथील ज्ञानवापी मशीद’, ‘मथुरा मुक्ती आंदोलन’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’, ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार’, ‘मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण’, ‘हिजाब आंदोलन’, ‘हलाल सर्टिफिकेट एक आर्थिक जिहाद’, ‘हिंदूंचे संरक्षण’, ‘मंदिर-संस्कृती-इतिहास यांचे रक्षण’, ‘धर्मांतर’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे म्हणाले, “केंद्रात आणि अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार आल्यामुळे राममंदिर निर्माण, लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधातील कायदे लागू होणे आणि कलम 370 हटवणे आदींविषयी सकारात्मक कार्य झाले असले, तरी काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे बाकी आहे. ओवैसी ‘बाबरी घेतली; पण ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, असे सांगत आहे. देशभर हिंदूंच्या मिरवणुका तथा धार्मिक उत्सवांवर भीषण हल्ले होत आहेत. मिशनर्यांकडून बलपूर्वक होणार्‍या धर्मांतरामुळे ‘लावण्या’सारख्या हिंदू मुलीला आत्महत्या करावी लागत आहे. काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला 32 वर्षे होऊनही काश्मिरी हिंदूंच्या हत्या आजही थांबलेल्या नाहीत. एकूणच हिंदू सर्वत्र असुरक्षित आहे. त्यामुळे हिंदूंनी संविधानिक अधिकारांसाठी संघटित होणे आवश्यक बनले आहे. हिंदूंच्या व्यापक संघटनासाठी हे अधिवेशन दिशादर्शक ठरेल.”
या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी म्हणाले, “यापूर्वी झालेल्या काही अधिवेशनांना मी उपस्थित राहिलो आहे. हिंदु धर्मावर होणारे आघात, हिंदु संघटित होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, यांसह अनेक विषयांवर त्यात मंथन झाले आहे. तरी हिंदू हिताची चर्चा आणि प्रत्यक्ष कृती होणार्या या अधिवेशनाला प्रसिद्धीमाध्यमांनी अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी.”
या अधिवेशनाला प्रामुख्याने ‘सीबीआय’चे माजी हंगामी संचालक श्री. नागेश्वर राव, काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे तेलंगाणा येथील प्रख्यात आमदार आणि हिंदु शेर म्हणून प्रख्यात असलेले टी. राजासिंह, ‘पनून काश्मीर’चे श्री. राहूल कौल, झारखंड येथील ‘तरुण हिंदु’ संघटनेचे अध्यक्ष श्री. नील माधव दास, यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मराठा तितुका मेळावावा प्रतिष्ठान, ग्राहक संरक्षण सेना, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था यांच्यासह शिवसेना, मनसे, अधिवक्ता, उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ असे 15 जण सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील 45 हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी समर्थन पत्रे दिली आहेत. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच “HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेलद्वारे केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

राजस्थान येथील अपघातात हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे ठार

Spread the love  पती, पत्नी, मुलगा, मुलीचा समावेश हुपरी : येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *