बेळगाव : वायव्य मतदार संघातील दोन्ही जागा आम्ही नक्की बहुमताने जिंकू, राज्यसभेतही लेहरसिंग यांच्यासह तिन्ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, आमच्यात कसलाही गोंधळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीची संपूर्ण जगाने प्रशंसा केली आहे. त्यांचा केवळ नावामुळेच आमचा विजय निश्चित आहे. वायव्य मतदारसंघातील दोन्ही जागा आम्ही नक्की बहुमताने जिंकू, राज्यसभेतही लेहरसिंग यांच्यासह तिन्ही जागा भाजप जिंकेल. आगामी विधानसभा निवडणुकीत 140 ते 150 जागा भाजप नक्की जिंकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कर्नाटकात उमेदवारी देण्यावर कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. पक्ष काय निर्णय घेतो ते पाहू. पंतप्रधान मोदींच्या निर्देशानुसार निवडणूक लढवली जाईल. आगामी निवडणुकीची धुरा तुम्ही सांभाळणार का या प्रश्नावर नेतृत्व करण्याचा प्रश्नच येत नाही. सामूहिक नेतृत्वाखालीच सगळीकडे दौरे करू. शक्तीपलीकडे जाऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करू. मतदार मोदी आणि भाजपच्याच बाजूने आहे. त्यामुळे कसली भीती नाही. कुठेही बोलावले तरीही 24 तास दौरा करण्यासाठी मी सज्ज आहे. आणखी 10 वर्षे राज्यात दौरे काढेन. कुठल्याही कार्यकर्त्याला दुखावण्याचा प्रश्नच नाही. सर्वाना विश्वासात घेऊनच पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करेन असे येडियुरप्पा यांनी सांगितले. सिद्धरामय्या ‘डेस्परेट’ झालेत. म्हणून काहीही बरळत सुटले आहेत. निवडणुकीत काँग्रेसचा प्रभाव निश्चित आहे म्हणूनच ते पाहिजे ते बोलत आहेत. संघासह अनेक बाबतीत कडवट विधाने त्यांनी केली आहेत. त्यातून त्यांना काहीच लाभ होणार नाही. उलट एक विरोधी पक्षनेता, माजी मुख्यमंत्री असे बोलतो म्हणून लोकच त्यांना कंटाळले आहेत. आपला मान ते स्वतःच घालवून घेत आहेत अशी टीका त्यांनी केली.
