Monday , December 8 2025
Breaking News

“कर्नाटकचे मुख्यमंत्री अमित शाहांसमोर खोटं बोलले, ते…”, जयंत पाटलांचा विधानसभेत मोठा दावा; फडणवीसांचं खोचक प्रत्युत्तर!

Spread the love

 

नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमाप्रश्नी बोम्मईंनी केलेले ट्वीट्सही चर्चेचा विषय ठरले होते. बेळगाव, कारवार, निपाणी आणि सीमाभागातील इतर गावांवर कर्नाटककडून दावा सांगितला जात आहे. शिवाय सांगलीच्या जतमधल्याही ४० गावांवर कर्नाटकनं दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमवीर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याबरोबरच वादग्रस्त विधानं न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. याच बैठकीत बोम्मई यांनी वाद निर्माण करणारं ट्वीट फेक असल्याचा दावा केला होता. या मुद्द्यावरून आज महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील यांनी मोठा दावा केला.

नेमकं काय झालं?
मॉर्फ्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातून संबंधितांची बदनामी होत असल्याचा मुद्दा आज अधिवेशनात चर्चेला आला. त्यावर चर्चा होत असताना ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड आहे की नाही, हे पाहाणं महत्त्वाचं असल्याचा मुद्दा अशोक चव्हाण यांनी मांडला.”एखाद्याचं ट्विटर अकाऊंटही बऱ्याचवेळा हॅक केलं जातं. ते त्याचंच आहे का हेही पाहण्याची गरज असते. ब्लू टिक असेल, तर ते अकाऊंट त्याच व्यक्तीचं आहे याची खात्री असते. सीमाप्रश्नाबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली विधानं, जी अजूनही त्या ट्विटर अकाऊंटवर आहेत, महाराष्ट्राची बदनामी करणारी विधानं त्या ट्विटर अकाऊंटवर आहेत. ते व्हेरिफाईड अकाऊंट आहे. आमचं म्हणणं आहे की त्यांना पाठिशी घालण्याचं काही कारण नाहीये”, असं काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

“आपणच ते फेक आहे असं का म्हणायचं?”
“जर महाराष्ट्राबाबत चिथावणी देणाऱ्या गोष्टी त्या अकाऊंटवर असतील, तर आपण त्यावर काय भूमिका घेणार? ते व्हेरिफाईड अकाऊंट आहे. त्यामुळे ते फेक आहे असं सांगून आपण त्याची पाठराखण का करायची? ते चिथावणी देत आहेत आणि आपण इथे शांत बसतो. आपणच म्हणतोय की ते फेक आहे, याला आधार काय आहे?” असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

जयंत पाटलांचा दावा
दरम्यान, चव्हाणांच्या या मुद्द्यावर फडणवीसांनी उत्तर देताना “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर सांगितलंय. मी स्वत: त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवेन”, असं सांगितलं. मात्र, त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी गंभीर दावा केला. “बोम्मईंनी जे ट्वीट केलंय, त्याबाबत कर्नाटकच्या विधानसभेत तासाभरापूर्वी चर्चा झाली. त्यांनी आपल्या ट्वीट्सपासून घुमजाव का केलं? असा आक्षेप कर्नाटकच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे बोम्मईंचं ट्वीट खरंच आहे. ते गृहमंत्र्यांसमोर जे बोलले, ते खरं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे”, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांचा टोला
दरम्यान, यावर बोलतना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना खोचक शब्दांत टोला लगावला. “जयंत पाटील यांनी या विधानसभेत जास्त लक्ष द्यावं. कर्नाटकच्या विधानसभेत कमी लक्ष द्यावं. तिथे काय घडलं याची खात्रीशीर माहिती घेऊ आणि मग त्यावर चर्चा करू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *