
जुन्नर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन मुंबईला निघाले आहेत. ते मुंबईतीली आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगेंचा मोर्चा आता जुन्नरमध्ये दाखल झाला आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील हे जुन्नर शहरात दाखल झाले आहेत. जुन्नर शहरातील वनविभागाच्या गेस्ट हाऊसला ते पोहोचले आहेत. काही वेळ गेस्ट हाऊसला विश्रांती घेऊन जरांगे पाटील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून मराठा आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प करणार आहेत. यानंतर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
जुन्नरमध्ये आलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. किल्ले शिवनेरीजवळ जरांगेंसोबत जाण्यासाठी हजारो मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली असून काही वेळात जरांगे पाटील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन आरक्षणाचा संकल्प करणार आहेत.तर जुन्नरमध्ये राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार होते. मात्र आता ही भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या मोर्च्याची जुन्नरमध्ये येण्यापूर्वी अहिल्यानगर शहरात मोठी दमदार एन्ट्री झाली. नगर शहराच्या सुरुवातीला असणाऱ्या शेंडी या गावातील ग्रामस्थांनी मनोज जरांगे यांचे जल्लोष स्वागत केले. जेसीबीने फुलांची उधळण तर फटाक्यांच्या आतिषबाजी करत त्यांचे नगर शहरात स्वागत करण्यात आले. रात्री १२ वाजता पाऊस सुरू असताना देखील हजारो ग्रामस्थ मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी हजर होते.

Belgaum Varta Belgaum Varta