नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची हत्या होण्याची घटना ताजी असतानाच साउथहॅम्प्टन वे केंबरवॉल येथे केरळमधील तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने इंग्लंडमधील भारतीयांमध्ये खळबळ उडाली आहे. अरविंद शशीकुमार ( वय २५) अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मेट्रोपॉलिटन पोलिसांनी अरविंदसोबतच फ्लॅटमध्ये राहणार्या सलमान सलीन (२५) याला ताब्यात घेतले आहे.
अरविंद शशीकुमार हा केरळमधील पानमपिल्ली नगर येथील मूळ रहिवासी होता. त्याने सलीम सलीनबरोबर साउथहॅम्प्टन वे केंबरवॉल येथे आपला फ्लॅट शेअर केला होता. शुक्रवारी पहाटे अरविंद मृतावस्थेत आढळला. त्याची चाकूने भाोसकून हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तो विद्यार्थी व्हिसावर मागील काही वर्ष लंडनमध्ये राहत होता. हत्या प्रकरणी सलीम सलीन याला अटक करण्यात आली असून, त्याला २० जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
इंग्लंडमध्ये आठवड्याभरात तीन भारतीयांची हत्या
अरविंद शशीकुमार हत्या प्रकरणी साउथवॉर्क आणि लॅम्बेथ येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी अदजेई-अडोह यांनी सांगितले की, “ही एक दुःखद घटना आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. मागील आठड्यात लंडनमधील नॉटिंगहॅममध्ये आयरिश-भारतीय विद्यार्थी ग्रेस कुमार आणि हैदराबादमधील भारतीय महिला तेजस्विनी रेड्डी यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. यानंतर आणखी एका तरुणाची हत्या झाल्याने इंग्लंडमधील भारतीयांमध्ये खळबळ उडाली आहे.