उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून बंद केलेले सिल्क्यरा येथून ड्रिलिंग रविवारी दुपारी 4 वाजता म्हणजेच 50 तासांनंतर पुन्हा सुरू झालं. टनलमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी येथून आतमध्ये अन्न पाठवण्यासाठी आणखी एक छोटा पाइप ड्रिल करण्यात आला आहे. या दुर्घटनेला आठ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. जसेजसे जास्त तास उलटत आहेत. तसतसं मजुरांचं मनोधैर्य खचत आहे. आमची लवकर सुटका करा, अशी मजुरांची मागणी आहे.
बचावासाठी आणखी वेळ लागणार
उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, बोगदा कोसळल्यानंतर मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे. सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी पाच दिवस ते एक आठवडा लागू शकतो.
नातेवाईकांना मजुरांच्या सुटकेकडे प्रतीक्षा
जसजसे दिवस जात आहेत, तसतशी घरातील सदस्यांची चिंताही वाढत आहे. अडकलेल्या अनेक मजुरांचे कुटंबिय रविवारी सिल्क्यरा येथे पोहोचले. उत्तर प्रदेशच्या मोतीपूर काला येथून सिल्क्यरा येथे आलेल्या लोकांमध्ये अशोक चौधरी यांचाही समावेश आहे. अशोकने सांगितले की, बोगद्यात अडकलेल्या लोकांमध्ये त्याचा मोठा भाऊ संतोष चौधरी देखील आहे. आपल्या भावाला प्रोत्साहन देण्यासाठी तो येथे आला आहे. त्याच्या मोठ्या बहिणीनेही त्याला भावाला घेऊनच घरी येण्यास सांगितलं आहे. अशोकने सांगितलं की, त्याचा मोठा भाऊ संतोष चार महिन्यांपूर्वी गावातील काही तरुणांसह कामानिमित्त येथे आला होता. अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यापासून सगळेच चिंतेत आहेत.