Monday , August 24 2026
Breaking News

नंदगड जेसीएस मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

हलशी : नंदगड येथील जेसीएस मराठी मुला-मुलींच्या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दोन्ही शाळांमधील शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांचा विद्यार्थिनींच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींकडून उपस्थित महिला शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिना उत्तुरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात जागतिक पातळीवर महिलांनी आपल्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आज समाजात महिलांना सन्मानाचे स्थान मिळाले असून त्यातून नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी महिलांनी सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. महिला केवळ चूल आणि मूल या चौकटीत न राहता घराचा उंबरठा ओलांडून समाजाच्या सर्व क्षेत्रांत पुढे यायला हव्यात, असे त्या म्हणाल्या. त्यांनी महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी घातला आणि महिलांच्या सशक्तीकरणाला खरे बळ दिले, असे सांगितले. महिलांनी आपल्या स्वसामर्थ्याची जाणीव ठेवून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षिका छाया मिटकर यांनी महिलांनी आज अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली असली तरी सामाजिक व धार्मिक बंधनांमधून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. स्त्रियांनी उच्च शिक्षण घेतल्यास त्यांना स्वाभिमानाने जीवन जगता येईल आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळेल, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात शिक्षिका सविता देसाई यांनी महिलांनी आज विविध क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, असे सांगितले. महिलांच्या प्रगतीमुळे समाजाचा सर्वांगीण विकास होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना पाटील यांनी केले.
यावेळी सीआरपी स्मिता चपागावकर, चन्नेवाडी शाळेचे शिक्षक प्रकाश देसाई, अध्यक्ष प्रणाली तोरागल, भूषण पाटील, तसेच पालक प्रतिनिधी प्रणाली वसंत गंगाधर, आराधना परशराम शिरोडकर, सिंधू कंग्राळाकर, वैशाली सुतार आदी उपस्थित होते.
मुलांच्या शाळेतील शिक्षकांमध्ये मंजुळा देमट्टी, मेघा गुरव, स्वाती पाटील, प्रियांका चन्नेवाडकर, सविता देसाई यांचा सहभाग होता. तर मुलींच्या शाळेतील शिक्षकांमध्ये छाया मिटकर, कल्पना बाबलीचे व इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाला पालकवर्ग व विद्यार्थ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत स्त्री शिक्षण, स्वावलंबन आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षक भरतीत मराठी माध्यमाच्या १९५ जागांचा तातडीने समावेश करा : आमदार विठ्ठल हलगेकर यांची मागणी

Spread the love    खानापूर : कर्नाटकातील सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत रिक्त असलेल्या मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *