माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणी निषेध
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचे निपाणी सीमाभागात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानाचा निषेध म्हणून निपाणी परिसरातील शिवप्रेमींनी बुधवारी (ता. २३) येथील बस स्थानका जवळील छत्रपती धर्मवीर संभाजी चौकात राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमेचे दहन करून जोडो मारो आंदोलन केले.
सकाळी १० वाजता निपाणी व परिसरातील सर्व शिवप्रेमी एकत्र आल्यानंतर माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर संभाजी चौकात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवप्रेमींनी चौकात मानवी साखळी करून विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर त्रिवेदी व कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केल्यानंतर प्रतिमेचे दहन करण्यात आले.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे आक्षेपार्ह विधान केले आहे, ते योग्य नाही. मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला अशी विधाने करणे हे न शोभणारे आहे. त्यामुळे त्यांनी शिवप्रेमीची माफी मागून विधान मागे घ्यावे. या विधानाचा निपाणी व परिसरातील शिवप्रेमींकडून जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, उद्योजक रोहन साळवे, श्रीनिवास संकपाळ, अस्लम शिकलगार, अल्लाबक्ष बागवान, सचिन लोकरे, प्रा. भारत पाटील, झुंजार दबडे, अवधूत गुरव, किरण कोकरे, संदीप चावरेकर, संदीप इंगवले, वैभव पाटील, विशाल डाफळे, नवनाथ चव्हाण यांच्यासह निपाणी परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते. मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याच्या उपरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Belgaum Varta Belgaum Varta