प्रियांका खांडके यांचे मार्गदर्शन : ४०० विद्यार्थ्यांची तपासणी
निपाणी (वार्ता) : येथील इनरव्हील न्यू जेन ग्लोरी क्लबतर्फे सीएमसी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दंत तपासणी शिबीर पार पडले. यावेळी सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून त्यांना टूथब्रशचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रियांका खांडके उपस्थित होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापिका राजनंदा बाळेकुंद्री यांनी स्वागत केले.
डॉ. खांडके म्हणाल्या, लहान मुलांनी दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. दुधाचे दात पडून नवीन दात सुरळीत येण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पालकांनी आपल्या पाल्यांना चॉकलेट, कोल्ड्रींक्स यापासून दूर ठेवले पाहिजे, असे सांगितले. यावेळी नगरसेविका उपासना गारवे व उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी, विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विविध रोगांचा सामना करण्यासाठी आरोग्यपूर्ण पदार्थाचे सेवन करावे. गुरुवर्य, माता- पित्यांचे संस्कार विसरु नये. शिक्षणाच्या जोरावर विविध पदांवर कार्यरत होण्याची जिद्द मनात बाळगून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्षा निता बागडे, नगरसेविका दीपाली गिरी, इनरव्हील सदस्या पुष्पा कुरबेट्टी, कविता कुरबेट्टी, जे. व्ही. गुडगन्नवर, डॉ. ऐश्वर्या खांडके यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व क्लबचे सदस्य उपस्थित होते. न्यू जेन ग्लोरी क्लबच्या अध्यक्षा स्नेहा संकपाळ यांनी आभार मानले.