परिस्थितीवर केली मात : ध्येयाबरोबर परिश्रम आवश्यक
निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना घोषित केली होती. या अंतर्गत सर्वत्र अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू केली. या अग्निवीर भरतीत बोरगाव येथून भरती होणारा राहुल बाबासाहेब माळी हा पहिला युवक ठरला आहे. त्यामुळे त्याचे बोरगाव शहर परिसरातून कौतुक होत आहे.
निपाणी भागातील अनेक युवक सैन्य दलात भरती होताना दिसत आहेत. मात्र अग्निवीर भरती प्रक्रियेत कसा प्रतिसाद मिळेल,याबद्दल उत्सुकता होती. यामध्ये राहुल माळी यांने जिद्दीने बोरगाव परिसरात सर्वप्रथम या योजनेतून भरती होऊन शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बिदर येथे झालेल्या सैन्य भरती रॅलीत त्याने शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली होती. तर बेळगाव येथे झालेल्या स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेत यश मिळवले. याद्वारे बोरगाव येथून अग्निवीर भरतीचे खाते त्याने उघडले आहे.
२०२१ मध्ये येथील युवक अक्षय गुरव यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. तर २०२२ मध्ये काही युवक भरती झाले होते. आता अग्निवीर भरतीत देखील बोरगाव शहराने आघाडी घेतली आहे. राहुल माळी यांनी सैन्य दलात भरती होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. परिस्थितीची जाणीव करून घेऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी केलेले परिश्रमाला शेवटी यश मिळाले आहे.
आपण नेहमी मनाशी जिद्द बाळगावी व ध्येय निश्चित करावे. तरच आपल्याला यश हे निश्चितच मिळत असते. पण त्याला कष्ट करण्याची गरज असते. आज युवक सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. योग्य मार्गदर्शन घेऊन वाटचाल केल्यास सैन्य दलात भरती होण्यास मदत होत असल्याचेयावेळी राहुल माळी यांनी सांगितले.