‘आषाढी’मुळे मागणीत वाढ; निपाणी बाजारातली चित्र
निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, शेंगदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये साबुदाणा, शेंगदाणाचे भाव वाढले असून भगरीचे भाव स्थिर आहेत. साबुदाण्याच्या क्विंटलच्या दरात ५० ते १०० रुपयांची वाढ झालेली आहे. तर खजूर आणि भगरीचे दर स्थिर आहेत.
आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यंदा या उपवासाच्या पदार्थांना मागील वर्षीच्या तुलनेत मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून होणारी मागणी अपेक्षित धरून यंदाही साबुदाणा, भगर आणि शेंगदाण्याची व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवली आहे. त्याच्या खरेदीसाठी मागील दोन दिवसापासून बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली होती. याशिवाय श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थाचे दर अजून वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बाजारात तमिळनाडू येथून साबुदाण्याची आवक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून शेंगदाण्याची आवक होते. तर नाशिक येथून भगरची आवक होते. यावेळी भगर आणि शेंगदाण्याचे उत्पादन चांगले झाले आहे.
————————————————————-
केळी ५० रुपये डझन
गेल्या दोन महिन्यापासून निपाणी आणि परिसरातील केळीचे उत्पादन घटले आहे. मागणी वाढत असल्याने त्याचे दरही दुप्पट झाले आहेत. एरव्ही २५ रुपये डझन प्रमाणे मिळणारे केळी आता आषाढीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५० डझन प्रमाणे विक्री केली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.
——————————————————————–
‘साबुदाणा सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. यावर्षी क्विंटल मागे प्रतवारीनुसार ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. शिवाय शेंगदाण्याचे दरही वाढले असले तरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.’
-प्रशांत कांबळे, किराणा, व्यापारी निपाणी