Thursday , November 21 2024
Breaking News

मोदी सरकारकडून विरोधकावर केवळ टीकास्त्र

Spread the love

 

माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार; काँग्रेसच्या प्रचारार्थ सभा

निपाणी(वार्ता) : मोदी सरकार विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आले. पण एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकावर केवळ टीका करण्याचे काम केले. दिल्लीत लोकाभिमुख सरकार असताना मोदी सरकारने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. त्यामुळे मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांनी सांगितले. चिक्कोडी लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत बुधवारी (ता.१) सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
शरदचंद्र पवार म्हणाले, भाजपने विविध प्रकारची आस्त्रे वापरून विरोधकांना अडकवण्याचे काम सुरू ठेवले आहे. शिवाय जनतेला भूलथापा देत आहे. याउलट राज्यातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गरिबांसाठी पाच गॅरंटी योजना अंमलात आणल्या आहेत. तरुणाकडे मोठी ताकद असून त्यांना दुष्ट प्रवृत्तीकडे मोदी सरकार घेऊन जात आहे. परिणामी देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुढील काळात घटक पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारला उलथवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
अहमदाबादचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी, भाजप सरकारने हजारो युवकांचा रोजगार हिरावला आहे. शेतमालासह इतर जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावून सर्वांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय भाजप काळातच महागाई वाढली आहे. देशात काँग्रेस सत्ता आल्यास पाच वर्षात ३० लाख लोकांना सरकारी नोकऱ्या, गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला एक लाख रुपये दिले जातील. डिग्री आणि डिप्लोमा झालेल्या बेरोजगार युवकांना आर्थिक मदत व शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ होणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, राज्यातील सरकार हे गरीब, शेतकरी आणि कामगारांचे आहे. काँग्रेस सरकार आल्यानंतर पाच गॅरंटी अंमलात आणून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. ७० वर्षात ही पहिलीच ऐतिहासिक योजना आहे. राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना आशीर्वाद करावे.
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे लक्ष राष्ट्रवादीकडे होते. कार्यकर्ते, नेते मंडळी आणि राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा करूनच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. गेल्या दहा वर्षात महागाईने कळस गाठला. भाजपच्या काळात मतदारसंघात कोणतीही विकास कामे झाली नाहीत. राजकीय शक्ती आणि वारसा नसतानाही गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत आपण दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. भाजपाकडे भावनिक करण्याची कला असून कोणत्याही अमिषाला बळी न पडता काँग्रेसला मताधिक्य द्यावे. यापुढील काळात शरदचंद्र पवार आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी तयांचे सहकार्य राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी अशोककुमार असोदे, राजू खिचडे, अरुण निकाडे, नानासाहेब पाटील, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, सोनू कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. के. डी. पाटील यांनी स्वागत केले. अस्लम शिकलगार यांच्यासह तेली समाजातील नागरिकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
सभेस मंत्री डी. सुधाकर, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, राहुल जारकीहोळी, पृथ्वीराज पाटील, दत्तचे संचालक इंद्रजीत पाटील, सुनील पाटील -भोज, आनंद गिंडे, नगरसेवक रवींद्र शिंदे, निरंजन पाटील -सरकार, गजानन कावडकर, सतीश पाटील, गोपाळ नाईक, इम्रान मकानदार, शिरीष कमते, धनश्री पाटील, शुभांगी जोशी, सुनिता जोशी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन

Spread the love  राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *