बोरगाव येथे ‘अरिहंत’तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
निपाणी : शैक्षणिक जीवनात दहावी परीक्षा ही महत्त्वाची आहे. हे ओळखून विद्यार्थी परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी गोंधळात राहून अभ्यासाबाबत तणाव वाढून घेतात. त्यामुळे परीक्षेचे नियोजन बिघडते. तरी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावे व आपले ध्येय निश्चित ठरवून पुढील करिअरच्या दृष्टीने कमी वेळेत जास्त अभ्यासाला महत्त्व द्यावे, असे मत अरिहंत शाळेचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील अरिहंत सभागृहात अरिहंत परिवाराच्या सहयोगाने व बेळगावच्या जितो करियरच्या मार्गदर्शनाने नववी व दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन उत्तम पाटील होते. तर प्रमुख वक्ते म्हणून बालचंद बाली, डॉ. राधिका कुलकर्णी, लक्ष्मण आष्टगी, जितोचे अध्यक्ष पुष्पक हनुमन्नवर होते.
उत्तम पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च पदावर पोहोचत आहेत. त्यांची धडपड पाहून अरिहंत परिवाराकडून जितो करिअर अकॅडमी यांच्यावतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन दहावी परीक्षेत उच्च गुण मिळवून उच्च पदवी प्राप्त करावी. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित ठरवून शिक्षण तज्ञांचा सल्ला घेतल्यास जीवनात यशस्वी होतो.
डॉ. राधिका कुलकर्णी यांनी, दहावी परीक्षेबाबत पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकल्यास विद्यार्थी गोंधळात सापडतात. पण विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोंधळात न पडता मोबाईलपासून दूर राहून दररोज चार तास अभ्यासाला वेळ द्यावे. वेगवेगळे दहावी अभ्यासाला महत्त्व देऊन वारंवार उजळणी करावी. अभ्यासाचे नियोजन करून वेळापत्रक बनवावे. अभ्यास करीत असताना आपल्या आरोग्याकडे ही लक्ष देऊन तणावमुक्त राहून अभ्यास करण्याबाबत सल्ला दिला.
बालचंद्र बाली व लक्ष्मण आष्टगी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दहावी नंतरचा करियरबाबत माहिती दिली.
जितो संस्थेचे अध्यक्ष पुष्पक हनुमन्नवर यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. सहकार बरोबरच शिक्षण क्षेत्राला अधिक महत्त्व देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थीना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी अरिहंत परिवाराची धडपड सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शिबिरास बोरगाव, बोरगाववाडी, मानकापूर, चांदशिरदवाड व परिसरातील सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास अरिहंतचे संचालक अभयकुमार करोले, जीतो अकॅडमीचे राहूल हजारे, प्रवीण खेमलापुरे, अरिहंतचे मुख्य व्यवस्थापक अशोक बंकापुरे, सहायक व्यवस्थापक शांतिनाथ तेरदाळे, आण्णासाहेब भोजकर, बाळासाहेब हावले, शमिका शहा, एस. ए. पाटील, ए. ए. धुळासावंत, एस. बी. परीट, सचिव अमित दोशी, दयानंद सदलगे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर वर्ग व अरिहंत परिवाराचे पदाधिकारी हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta