महाराष्ट्र एकीकरण समिती : मंत्री राजेश क्षीरसागर यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र सरकारने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांपासून मोफत, सवलतीत प्रवेश योजना सुरु केली आहे. सदरचा निर्णय हा स्वागतार्ह आहे तसेच सीमाभागातील मराठीपण जोपासनेसाठी पोषक आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने सीमाभागात मार्गदर्शन बैठकांही आयोजित केल्या. त्यानुसार सदरच्या योजनेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून प्रवेश घेणारे सीमाभागातील विद्यार्थी पात्र होऊ शकतात असे दिसून येते. तत्पूर्वी प्रवेश घेतलेले विद्यार्थी या सदरच्या योजनेपासून वंचित राहतात, असे आढळून येते. तरी सदरचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने घ्यावा. जे विद्यार्थी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या अगोदर पासून शिक्षण घेत आहेत. त्यांनाही दिलासा द्यावा. त्यामुळे सीमाभागातील सर्वसामान्य आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा चांगला लाभ होणार आहे. त्या दृष्टीने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
मंत्री राजेश क्षीरसागर यांनी, सीमाभागातील नागरिकांच्या वतीने दिलेले निवेदन स्वीकारून आपण नेहमीच सीमाभागाच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील आहोत. यापूर्वीही अनेक प्रकारच्या सवलती सीमा भागातील विद्यार्थ्यांना दिले आहेत. लवकरच या संदर्भात बैठक घेऊन सीमा भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष नवनाथ चव्हाण, प्रशांत नाईक, दीपक वळीवडे, भारत पाटील, बंटी कोकरे, अरुण आवळेकर, सुनील हिरुगडे, बाळू कमते यांच्यासह सीमाभागातील कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta