बेंगळुरू : 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे आयोजित बैठकीत या सोहळ्याच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
1924 मध्ये बेळगाव येथे पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे विशेष बैठक झाली. या बैठकीत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, लोकप्रतिनिधी, आणि काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.26 डिसेंबर रोजी बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारिणीची विशेष बैठक होणार आहे, तर 27 डिसेंबरला भव्य सार्वजनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू असून, “गांधी भारत” या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. म्हैसूर दसऱ्याच्या धरतीवर हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. बेळगावमधील 30 महत्त्वाच्या चौकात आणि 32 किलोमीटरच्या मार्गावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.काँग्रेस रोडवर 2.1 किलोमीटरच्या अंतरावर तात्पुरत्या स्वरूपातील भव्य गोपुरांची उभारणी होणार आहे. याशिवाय, ऐतिहासिक वीरसौधचा विकास करण्यात येणार आहे. या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या भव्य पुतळ्याची उभारणी होईल आणि ग्रंथालयाची स्थापना करण्यात येईल. कर्नाटकातील महात्मा गांधींनी भेट दिलेल्या 120 ठिकाणी स्मृती स्थळे उभारण्याची योजना आहे. हा ऐतिहासिक सोहळा काँग्रेसच्या परंपरेला आणि गांधीजींच्या विचारांना उजाळा देणारा ठरणार आहे.