Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटकच्या हम्पी येथे इस्रायल महिलेसह दोघींवर बलात्कार, परदेशी पर्यटकांना मारहाण; एकाचा मृत्यू

Spread the love

 

हम्पी : कर्नाटकातील हम्पी येथे इस्रायलच्या २७ वर्षीय आणि भारतातील होम स्टे मालक असलेल्या २९ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी रात्री हा गुन्हा घडला. यावेळी या महिलांसह तीन पुरूष पर्यटकही उपस्थित होते. यापैकी एका पुरूष पर्यटकाचा मृतदेह पोलिसांना तलावात आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास सानापूर तलावाजवळ सदर घटना घडली. इस्रायलची महिला पर्यटक, अमेरिकेतील एक पुरूष पर्यटक, ओडिशा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक पुरूष पर्यटक त्यांच्या होम स्टे मालक महिलेसह याठिकाणी भटकंतीसाठी आले होते. यावेळी त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोराने पाचही जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले. तसेच दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केला. इस्रायलमधील पीडित महिलेचे नाव नमा (२७) आहे. तर अमेरिकेतील पर्यटकाचे नाव डॅनियल (२३) आहे. महाराष्ट्रातील पर्यटक पंकज (४३), ओडिशातील पर्यटक (४२) आणि होम स्टे मालक अंबिका नायक (२९) हे रात्री तलावाशेजारी संगीताचा आनंद घेत थांबले होते. पर्यटक थांबलेल्या ठिकाणी रात्री दुचाकीवर बसलेले तीन आरोपी तिथे आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर जाण्याचा रस्ता विचारला. होम स्टे मालक स्थानिक असल्यामुळे तिने जवळपास पेट्रोल पंप नसल्याचे म्हटले. त्यानंतर दुचाकी चालकांनी त्यांच्याकडे पेट्रोलची मागणी केली, थोड्या वेळाने ते पर्यटकांकडे पैसे मागू लागले. पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा दुचाकीस्वार आक्रमक झाले आणि त्यांनी पर्यटकांशी गैरवर्तन केले. महिला पर्यटकांना त्रास देत असताना इतर तीन पुरूष पर्यटक आरोपींना रोखण्याचा प्रयत्न करत होते. या झटापटीत आरोपींनी तीनही पुरूष पर्यटकांना बाजूलाच असलेल्या कालव्यात ढकलले. डॅनियल आणि पंकजला पोहायला येत असल्यामुळे ते पोहत बाहेर पडले. पण ओडिशाचा पर्यटक बिबास आढळून आला नाही, असे पोलिसांनी सांगितले. इतर दोघांना दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

शुक्रवारी सकाळी शहराचे पोलीस निरीक्षक प्रकाश माले आणि त्यांच्यासह इतर पोलिसांनी श्वान पथकाला बरोबर घेत तपास सुरू केला. घटनास्थळी एक दुचाकी, कॅमेऱ्याची बॅग, पॉवर बँक, पेन, तुटलेला गिटार, सिगारेट आणि रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. पोलीस अधिक्षक राम अरसिड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी सहा पथके नेमली गेली आहेत. लवकरच आरोपींना पकडले जाईल. महिलेच्या तक्रारीनंतर आम्ही तात्काळ कारवाई सुरू केली आहे, असे ते म्हटले. होम स्टे मालक पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *