बेंगळुरू : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रन्या राव हिला जामीन देण्यास आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाने नकार दिला आहे. रन्या राव हिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत न्यायालयाने जामीनाची याचिका फेटाळली आहे. यावेळी न्यायाधीश विश्वनाथ सी. गौडर यांच्या न्यायालयाने रन्या राव हिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे या सरकारी वकिलांच्या मागणी मान्य केली.
रन्या राव हिला एका हाय प्रोफाइल सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तिने मॅजिस्ट्रेट कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता जो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर तिने आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित विशेष न्यायालयात धाव घेतली मात्र येथे देखील तिची याचिका फेटाळण्यात आली आहे.
रन्याचा जामीन अर्जाला फेटाळल्यानंतर तिची कायदेशीर टीम सेशन्स कोर्टात जाण्याची तयारी करत आहे. मात्र जोपर्यंत जामीन अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत रन्या राव हिला न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.
तपासात उघड झाले की, रन्या राव ही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी असून तिने गेल्या वर्षभरात तब्बल ३० वेळा दुबईचा प्रवास केला आहे. ज्यामध्ये तिने मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केली. मिळालेल्या माहितीनुसार तस्करी करून भारतात आणलेल्या एक किलो सोन्याच्या मागे तिला एक लाख रुपये मिळत होते.
चौकशी दरम्यान रन्या रावने दावा केला की तिला एका अनोळखी क्रमांकावरून दुबई विमानतळावर कोणालातरी भेटण्याबाबत फोनवर सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच तिने युट्यूबवर व्हिडीओ पाहून सोने कसे लपवावे याबद्दल माहिती मिळवली. तपासात असेही आढळून आले की तिचे सावत्र वडील पोलिस महासंचालक (डीजीपी) के. रामचंद्र राव यांनी एका कॉन्स्टेबलला तिला बेंगळुरू विमानतळावर प्रोटोकॉल टाळण्यास मदत करण्याचे निर्देश दिले होते.
तसेच तस्करीच्या प्रकरणाशी असलेल्या संबंधांचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) रन्या राव हिच्या लग्नातील फुटेज, पाहुण्यांच्या यादी आणि महागड्या भेटवस्तूंची तपासणी करत आहे.