Wednesday , March 11 2026
Breaking News

दिखाऊ साहित्य संमेलनांचा फुगा फुटणार कधी? सीमाभागातील मराठी पालकांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Spread the love

 

बिदर (अविनाश देवकते) : सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी नुकतेच भाल्की येथे तिसरे मराठी साहित्य संमेलन थाटामाटात पार पडले. व्यासपीठावरून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक ठराव मंजूर करण्यात आले आणि भाषणांचा पाऊसही पडला. मात्र, या संमेलनाच्या झगमगाटामागे एक कटू सत्य दडलेले आहे. केवळ वर्षातून एकदा असे कार्यक्रम घेऊन मराठीचा जागर होणार का? असा संतप्त सवाल आता सामान्यांतून उपस्थित होत आहे.

मराठीचा अभिमान की केवळ दिखाऊपणा?

संमेलनात सहभागी होणारे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यासपीठावर मराठी प्रेमाच्या आणाभाका घेतात, मात्र आपली मुले कोणत्या शाळेत शिकतात याचा विचार करत नाहीत. आपल्या जवळची मुले, नातवंडे यांना सर्रासपणे इंग्रजी किंवा कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. घरातूनच मराठीला हद्दपार करणाऱ्या या पालकांचे मराठी प्रेम केवळ ‘संमेलन’ पुरतेच मर्यादित आहे का? स्वतःची मुले परभाषेत शिकवून व्यासपीठावर मराठी संवर्धनाचे ठराव मंजूर करणे, हा एक प्रकारचा शुद्ध दिखाऊपणाच असल्याची टीका होत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व कुठे?

एकेकाळी सीमाभागातील मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेली ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ आज बिदर जिल्ह्यात नेमकी काय कार्य करत आहे, हे सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे. समितीचे संघटन कुठे कार्यरत आहे की संघटना केवळ कागदावरच उरली आहे? कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून, जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा देणारी फळी संपली आहे की काय, अशी शंका या भागातील मराठी भाषिकांना येत आहे.

ठराव हवेत, कृती शून्य

कुणबी-मराठा शिक्षकांची भरती, मराठीला द्वितीय भाषेचा दर्जा यांसारखे ठराव दरवर्षी मांडले जातात. पण संमेलन संपले की कार्यकर्त्यांचा उत्साहही ओसरतो. वर्षभर मराठी भाषेचा जागर करण्यासाठी कोणतेही ठोस उपक्रम राबवले जात नाहीत. केवळ फोटोसेशन आणि औपचारिकता म्हणून संमेलने उरकण्यापेक्षा, मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि तरुण पिढीला भाषेकडे वळवण्यासाठी जमिनीवर काम करण्याची गरज आहे.

जर मराठी भाषेचा खरोखरच विकास करायचा असेल, तर तो केवळ व्यासपीठावरून बोलून होणार नाही. त्यासाठी मराठी शाळांचे सक्षमीकरण आणि कार्यकर्त्यांमधील प्रामाणिकपणा असणे अनिवार्य आहे. अन्यथा, ही संमेलने म्हणजे केवळ ठराव मंजूर करण्याचा वार्षिक सोहळाच ठरतील.

About Belgaum Varta

Check Also

बजेट अधिवेशनानंतर कर्नाटकात नेतृत्वबदलाची लढत तीव्र होणार?

Spread the love  बंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. एकीकडे सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *