दावणगेरे : आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्ष ताकदीने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. काल, शनिवारी (दि. ४ मार्च) आपची पहिली सभा दावणगेरे येथे संपन्न झाली. या सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, कर्नाटकच्या डबल इंजिन सरकारने केवळ भ्रष्टाचार डबल केला, पण विकास काही केला नाही. कर्नाटकला आता आपसारख्या अतिशय प्रामाणिक पक्षाचे मोनो इंजिन सरकार हवे आहे. या जाहीर सभेत आपचे पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. केजरीवाल यांनी सभेला संबोधित करत असताना, शून्य भ्रष्टाचार, मोफत वीज, सरकारी शाळांमधून जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा, ३ हजारांचा शिधा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि किमान आधारभूत किंमत देऊ, अशी आश्वासने दिली.
केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील यावेळी टीका केली. ते म्हणाले, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान म्हणाले होते की, कर्नाटक राज्यात २० टक्क्यांवाल्यांचे सरकार आहे. मला (भाजपाला) मतदान करा मी भ्रष्टाचाराचे उत्थान करेल. त्यांनी डबल इंजिन सरकारला मतदान करण्याचे आवाहन केले. केजरीवाल पुढे म्हणाले, “लोकांना वाटले मोदी खरे बोलत आहेत, त्यामुळे लोकांनी डबल इंजिन सरकारला निवडून दिले. पण डबल इंजिन सरकारने २० टक्के कमिशनला ४० टक्क्यांवर नेऊन भ्रष्टाचार डबल करुन दाखविला आहे.”
आप ‘मोनो इंजिन’ सरकार
“कर्नाटक राज्यात भ्रष्टाचार २० टक्क्यांहून ४० टक्क्यांवर गेला. यावेळी डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवू नका. नाहीतर कमिशन आणखी डबल होईल आणि ८० टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर ते कदाचित १०० टक्के देखील होऊ शकते. मी ज्या ज्या ठिकाणी जातो, तिथे लोकांना एकच गोष्ट सांगतो. डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवू नका. लोकांना डबल इंजिन नाही तर मोनो इंजिन सरकार हवे आहे आणि आम आदमी पार्टी हे ते नवीन इंजिन आहे”, अशा शब्दात केजरीवाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
Belgaum Varta Belgaum Varta