बंगळूर : राज्यात कोरोना विषाणूची साथ हळूहळू डोके वर काढत असून सर्वत्र सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. यासाठी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर उद्या (ता. ६) आरोग्य विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेत आहेत.
आठ मार्च रोजी साजरा होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’बाबत जनजागृती करण्यासाठी विधानसौध येथे आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा संचालनालयातर्फे आयोजित ‘सायक्लोथॉन’च्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. के. सुधाकर सहभागी झाले होते.
पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर मंत्री म्हणाले की, देशात एच ३ एन २ विषाणूचा एक नवीन प्रकार आढळला आहे. मात्र, तो अद्याप राज्यात सापडलेला नाही. केंद्र सरकारने याआधीच करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, उद्या होणाऱ्या बैठकीत करावयाच्या पावलांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करून योग्य निर्णय घेतले जातील, असे सांगितले.
प्राथमिक अहवालानुसार, या विषाणूमुळे दीर्घकाळ खोकला होईल. मात्र, राज्यात कोणताही एच ३ एन २ स्ट्रेन आढळून आलेला नाही, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल देखील राज्यात ९५ आणि बंगळुरमध्ये ७९ नवीन रुग्ण आढळले आहेत.
१००० दिवसांनंतर बंगळुरसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यासह, राज्यात आतापर्यंत एकूण ३९१ सक्रिय प्रकरणे आहेत, आठवड्यात कोविडच्या पुष्टी झालेल्या प्रकरणांची टक्केवारी २.४४ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सिलिकॉन सिटी बंगळुरसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा साथीचे आजार सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta