शिंदगी : सांबरची शिंगे, हरीण, अस्वल प्राण्यांची कातडी आणि अन्य अवयव विकणाऱ्या व्यक्तीला सीआयडीच्या वन पथकाने अटक केली. विजापूर जिल्ह्यातील शिंदगी तालुक्यातील अलगुर गावातील बस स्थानकाजवळ एक व्यक्ती वन्य प्राण्यांची शिंगे, कातडी विकत असल्याची माहिती मिळाली. पीएसआय रोहिणी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर व्यक्तीला अटक करून कातडी, शिंगे आणि अवयव जप्त केले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव पवन जाफर भोसले (६०) असे असून तो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अस्वलदरा गावचा रहिवासी आहे. घोरपडीचे अवयव, इंद्रजाल, हरीण आणि अस्वलाची कातडी, सांबारची शिंगे, अस्वलाची नखे, जंगली मांजराची नखे, घुबडाची पिसे, अस्वलाचे दात, मुंगुसाचे पाय, जबडा असे विविध वन्य प्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक शरदचंद्र, डी एस पी मुत्तण्णा सावरगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वन्य जीव कायद्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta