Friday , December 12 2025
Breaking News

लक्ष्मण सवदी यांचा कॉंग्रेसमध्ये रितसर प्रवेश

Spread the love

काँग्रेस नेत्यांशी चर्चा, शशीकांत नाईकही काँग्रेसमध्ये दाखल

बंगळूर : माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शुक्रवारी भगवा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला. त्यांच्या सोबत माजी मंत्री शशीकांत नाईक, भाजप नेते अक्कप्पा आदीनीही भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येथील केपीसीसी कार्यालयात आज सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना सवदी म्हणाले, माझा पराभव झाला आणि त्यांनी मला उपमुख्यमंत्रीपद दिले. ते विसरून आता पक्ष सोडत असल्याची टीका ते करत आहेत. मात्र हायकमांडच्या नेत्यांनी शपथ दिली होती. २०२३ च्या निवडणुकीसाठी अथणीतून तिकीट देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी कोणतीही माहिती न देता माझी उपमुख्यमंत्रिपदावरून पदावनती केली व जबाबदारी दिली नसल्याची तक्रार त्यांनी केली.
यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष चंद्राप्पा, प्रचार समिती अध्यक्ष एम. बी. पाटील, माजी मंत्री विनय कुलकर्णी, बसवराज रायरेड्डी, ए. बी. पाटील, आमदार चन्नराज हट्टीहोळी आदी उपस्थित होते.
या आधी सवदी यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. अथणी मतदारसंघात भाजपचे तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. आज येथे कॉंग्रेस नेत्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे सरचिटणीस व कर्नाटकचे पक्ष प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
ते स्वतःच्या इच्छेने आमच्या (काँग्रेस) कुटुंबाचा सदस्य होण्यास सहमत झाले असल्याचे शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी स्वत: सावदी आणि सिद्धरामय्याही उपस्थित होते.
शिवकुमार म्हणाले की, भाजपचे आमदार सावदी हे आज दुपारी विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होराट्टी यांची भेट घेऊन विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देतील व त्यानंतर ते औपचारिकपणे काँग्रेसमध्ये सामील होतील. लक्ष्मण सवदी यांच्यासह भाजपचे अनेक सदस्य काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे शिवकुमार म्हणाले.
यावेळी बोलताना सिद्धरामय्या यांनी, भाजप नेत्यांनी सवदी याना अत्यंत वाईट वागणूक दिली असल्याचे सांगून आमच्या पक्षात त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले.
सवदी यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून भाजपने या आठवड्याच्या सुरुवातीला बेळगाव जिल्ह्यातील अथणीची जागा विद्यमान आमदार महेश कुमठळ्ळी यांना दिली होती. सवदी हे अथणीचे तीन वेळा आमदार आहेत. पण २०१८ च्या निवडणुकीत त्यांचा कुमठळ्ळी (तेव्हा काँग्रेसमध्ये) यांनी पराभव केला होता.
कुमठळ्ळी पक्षांतर करणार्‍यांच्या गटात होते, ज्यांनी २०१९ मध्ये बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-धजद युती सत्तेवरून खाली आणण्यासाठी आणि सरकार स्थापन करण्यात भाजपला मदत केली.

बिनशर्त प्रवेश : सवदी
काँग्रेस पक्षात येण्यासाठी कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत. मात्र, मी अथणी मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट देण्यास सांगितले आहे. तसेच अथणी मतदारसंघाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी द्यावा व मतदारसंघाचे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत करावी, असे मी काँग्रेस नेत्यांना सांगितले आहे. ते त्यांनी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपने दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. याआधी पोटनिवडणुकीत महेश कुमठळ्ळी यांना रिंगणात उतरवले होते. तेव्हा पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ व तुमच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या उर्वरित कालावधीसाठी महेश कुमठळ्ळी यांची नियुक्ती करू, अशी भाजप नेत्यांनी ग्वाही दिली होती. आता त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांच्यामुळे भाजपचे सरकार आले त्यांना तिकीट द्यायचे तर आर. शंकर, एच. नागेश यांना तिकीट का दिले नाही? इतरांना दिलेला न्याय सवदी यांना का नाही, असा सवाल त्यांनी केला. भाजपने मला उपमुख्यमंत्री केले आणि विधान परिषदेचे सदस्य केले. परंतु मला उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले. हा माझा अपमान नाही का? मी भ्रष्टाचार केला आहे का, असा सवाल सवदी यांनी केला.
पक्ष सोडण्याचे कारण म्हणजे भाजप नेत्यांची दुटप्पी भूमिका. येडियुरप्पांसह कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने आपल्याशी संपर्क साधला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना, त्यांचे सांत्वन करू, असा टोला त्यांनी लगावला.

बोम्मईंची प्रतिक्रीया
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याने दु:ख वाटते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपमध्ये त्यांना चांगले भविष्य होते. पण, ते भाजप सोडत आहेत, हे दु:खद आहे. आपल्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेसमध्ये जात असल्याचे सावदी यांनी सांगितले.

गुप्त ठिकाणी चर्चा
काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह बेळगावहून एका विशेष विमानाने आज सकाळी ते बंगळुरला आले आणि थेट एचएएल विमानतळावरून एका गुप्त ठिकाणी गेले, जिथे त्यांनी केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्याशी चर्चा झाली. तेथून ते सर्व एकाच गाडीतून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी पोहोचले. सवदी यांनी सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी सर्वांशी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा केली. बेळगावातील कागवाड, रामदुर्ग, अथणी आणि सौंदत्ती मतदारसंघाची जबाबदारी देण्याचे सांगून येथे काँग्रेसला विजयी करण्याचे आश्वासन नेत्यांना दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *