राहूल गांधी; कल्याण कर्नाटकासाठी पाच हजार कोटी
बंगळूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी जेवर्गी (कर्नाटक) येथे बोलताना राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची सत्ता आल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक कोटी रुपये आणि कल्याण कर्नाटक प्रदेशासाठी पाच हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले.
पावसाच्या दरम्यान, माजी काँग्रेस प्रमुखांनी एका निवडणूक रॅलीला संबोधित केले, जिथे त्यांनी ५० हजार सरकारी नोकऱ्यांच्या जागा भरण्याचे आश्वासन दिले .
“आम्ही या प्रदेशासाठी पाच हजार कोटी रुपये देऊ. प्रत्येक गाव पंचायतीला एक कोटी रुपये मिळतील,” गुलबर्गा जिल्ह्यात बोलताना गांधी म्हणाले.
कल्याण कर्नाटक प्रदेशात बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ, गुलबर्गा, बळ्ळारी आणि विजयनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. सत्ताधारी भाजपला केवळ ४० जागा मिळतील, असे भाकीतही त्यांनी केले.
कर्नाटकातील भाजपच्या मंत्र्यांनी सार्वजनिक कामांसाठी कंत्राटदारांकडून ४० टक्के कमिशन घेतले आणि त्यामुळे पक्षाला ४० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, तर काँग्रेस १५० जागा जिंकून पुढचे सरकार स्थापन करेल असा आरोप गांधी यांनी केला.
सध्याच्या भाजप सरकारला “चोरीचे सरकार” असे संबोधून ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षातील आमदारांची खरेदी केली आहे. आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. आमच्या पक्षाला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे गांधी म्हणाले.
त्यांनी काँग्रेसच्या चार महत्त्वाच्या “हमींचा” पुनरुच्चार केला: कुटुंब प्रमुखाला दोन हजार रुपये, प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज, बेरोजगार पदवीधरांना तीन हजार आणि बेरोजगार पदविकाधारकांना २५ वर्षांपर्यंत दोन वर्षांसाठी १५०० रुपये आणि बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला महिन्याला १० किलो तांदूळ.
याशिवाय गांधींनी गुरुवारी पक्षाची पाचवी “गॅरंटी” जाहीर केली होती, ती म्हणजे सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवास.
Belgaum Varta Belgaum Varta