बंगळुरू : उडुपी येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या शौचालयामधील व्हिडिओ चित्रीकरणाचे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण संवेदनशील असल्याने पुढील तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे.
उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, उडुपी येथील एका महाविद्यालयाच्या शौचालयात युवतींचे व्हिडिओ काढण्यात आलेले प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. मुलींचा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने सरकारने हे प्रकरण सुरुवातीपासूनच गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाचा तपास अधिक सखोल आणि स्वतंत्रपणे व्हावा यासाठी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले.