बंगळूर : मागील भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील खटल्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणातील पहिले आरोपी ईश्वरप्पा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने निदर्शने केली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात काँग्रेस नेत्यांवर हाय ग्राऊंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे प्रकरण रद्द करण्यासाठी सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने सिद्धरामय्या यांच्या विरोधात स्थगिती आदेश जारी केला आहे. १४ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या आंदोलनाबाबत महिला पीएसआय झहीदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी हाय ग्राऊंड पोलिसांनी सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना न्यायालयीन समन्स बजावले होते.
तत्कालीन विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, एम. बी. पाटील, प्रियांक खर्गे, व्ही. एस. उग्रप्पा आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड यांच्यासह एकूण ३६ काँग्रेस नेत्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
Belgaum Varta Belgaum Varta