मुख्यमंत्री सिध्दरामय्या; कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव
बंगळूर : समाजातील शांतता आणि सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तींविरुद्ध एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे येण्याचे आवाहन केले. कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुलबर्गा येथील पोलीस परेड मैदानावर सकाळी ९ वाजता राष्ट्रध्वज फडकावला. तत्पूर्वी, कल्याण कर्नाटक प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी धाडसी पाऊल उचलून लष्करी कारवाई करून हैदराबादच्या निजामाच्या तावडीतून मुक्त करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांनी अभिवादन केले. नंतर त्यांना विविध तुकड्यांनी मानवंदना दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री सिध्दरामय्या म्हणाले, भाषण स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. समाजातील शांतता आणि सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तींविरुद्ध आपल्याला एकजुटीने लढायचे आहे. स्वामी रामानंद तीर्थ आणि अगणित लढवय्यांचे बलिदान आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निर्धारामुळे हैदराबाद कर्नाटक निजामाच्या राजवटीतून मुक्त झाले आणि भारतीय संघराज्यात सामील झाले.
आमचे सरकार २०१३ मध्ये सत्तेवर आल्यानंतर हैदराबाद कर्नाटक प्रदेश विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आणि या भागाच्या विकासाला नवी चालना मिळाली. घटनेत कलम ३७१ (जे) समाविष्ट केल्यामुळे हाय-के कलमाला विशेष दर्जा मिळाला. हैद्राबाद कर्नाटक प्रदेश विकास मंडळाची स्थापना करून या भागाच्या विकासासाठी कार्यवाही करण्यात आली. पुढे या मंडळाचे नामकरण कल्याण कर्नाटक प्रदेश विकास मंडळ असे करण्यात आले.
समतेच्या नव्या वाटेवर चालणारे बुद्ध, सामाजिक क्रांतीचे प्रणेते व राज्यघटनेचे शिल्पकार बसवण्णा, डॉ. बी. आर. आंबेडकरांची तत्त्वे आणि आदर्श आमच्या सरकारने अक्षरश: अंगीकारले आहेत, सत्तेवर आल्याच्या दिवशी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्ही पाच हमी योजनांच्या अंमलबजावणीला तत्त्वत: मान्यता दिली आणि मुख्य चार हमी योजना १०० दिवसांच्या कालावधीत लागू केल्या. सरकार बोलते तसे काम करते हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’
ते म्हणाले की, कल्याण कर्नाटक क्षेत्राच्या विकासासाठी ३७१ (जे) च्या दुरुस्ती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कल्याण कर्नाटक प्रादेशिक विकास मंडळाने २०२३-२४ च्या चालू अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार पाच हजार कोटी खर्चाची कामे हाती घेतली आहेत.
यावेळी ग्रामविकास व पंचायत राज, आयटी, बीटी व जिल्हा प्रभारी मंत्री प्रियांक खर्गे, केकेआरडीबीचे अध्यक्ष डॉ. अजय सिंह, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराज, आमदार बी.आर. पाटील, एम.वाय. पाटील, अल्लमप्रभू पाटील, कनीज फातिमा, विधान परिषद सदस्य तिप्पण्णाप्पा कमकानूर, सशील जी. नमोशी, महापौर विशाल दरगी, प्रादेशिक आयुक्त कृष्णा बाजपेयी, आयजीपी अजय हिलोरी, जिल्हाधिकारी फौजिया तरन्नूम, आयुक्त चेतन आर, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.पी. सीईओ भंवरसिंग मीना आदींचा उपस्थित होते.
कल्याण कर्नाटकातील सात जिल्ह्यांमध्ये आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ऑगस्ट १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. तथापि, कल्याण कर्नाटक भागातील सात जिल्ह्यांना १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादच्या निजामापासून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या पार्श्वभूमीवर कल्याण कर्नाटक उत्सव दिन साजरा केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta