बंगळूर : पुढील महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी कर्नाटक राज्याकडून विविध राजकीय पक्षांना निधी दिला जात असल्याच्या माहितीवरून प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी (आयटी) ज्वेलर्स, व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. आज सकाळी कारवाई करून आयटी पथकांनी कांही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांचा तपास सुरू केला आहे.
प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी आज पहाटे बंगळुरमध्ये १० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आणि कर न भरता लपविलेल्या मिळकतीचा शोध घेतला. सध्या जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी, विशेषतः राजस्थान राज्यात बेहिशेबी पैसा पाठविला जात आहे का याचा शोध घेतला जात असल्याचे समजते.
आठवडाभरापूर्वीच ज्वेलरी दुकान मालकाच्या घरावर आयटी छापा झाला होता. यानंतर आयटी छाप्याच्या आणखी एका फेरीने व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांना हादरे बसले आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये पैसे पाठवले जात असल्याबद्दल आयकर अधिकाऱ्यांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर आयकर अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या घरांवर छापे टाकून कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. आरएमव्हीएक्स स्टेशन, मल्लेश्वर, डॉलर्स कॉलनी, बीएल सर्कलसह शहरातील अनेक ठिकाणी आयकर अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकून तपासणी केली. कॉफी बोर्डाचे संचालक चंद्रशेखर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. आरव्हीएक्स स्टेशनवर चंद्रशेखर यांच्या घरावर छापा टाकणारे अधिकारी पहाटेपासून कागदपत्रे आणि वारस तपासत आहेत.
१२० हून अधिक कारमधून गेलेल्या आयटी अधिकाऱ्यांनी पहाटे एकाच वेळी छापा टाकला. आयटी अधिकार्यांनी मल्लेश्वरम, सदाशिवनगर, डॉलर्स कॉलनी, मट्टीकेरे, सर्जापुरा रोडसह १० हून अधिक ठिकाणी सोन्याच्या व्यापाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. गेल्या आठवड्यातही करचुकवेगिरीप्रकरणी सोने व्यापाऱ्यांवर छापा टाकण्यात आला होता. छापेमारीत सापडलेल्या अनेक कागदपत्रांच्या आधारे आयटी अधिकाऱ्यांनी पुन्हा छापे टाकले.
गेल्या आठवडाभरापासून आयटीकडून सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत. सहा ऑक्टोबर रोजी आयटी अधिकाऱ्यांनी बंगळुरमध्ये दहाहून अधिक ठिकाणी छापे टाकले. चेन्नई आणि दिल्लीतील १५ हून अधिक आयटी अधिकार्यांच्या पथकाने बंगळुरमध्ये खासगी कंपन्या, त्यांचे मालक आणि सोन्याचे व्यापारी यांच्या घरांवर छापे टाकले. वाणिज्य कर विभागाच्या अधिकार्यांनी करचुकवेगिरीच्या आरोपाखाली १० ऑगस्ट रोजी बंगळुर ग्रामीण जिल्ह्यातील होस्कोटे शहरातील बिर्याणी केंद्रांवर छापे टाकले. केंद्रांची ३० हून अधिक विविध युपीआय खाती, अनधिकृत निधी आढळून आला. सुमारे १.४७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.