Sunday , June 14 2026
Breaking News

डोळे उघडताच स्वप्न संपते, डोळे मिटताच संसार संपतो : आचार्य राजरक्षितसूरिजी

Spread the love

 

बेळगाव : “स्वप्न कितीही सुंदर आणि आनंददायी असले तरी डोळे उघडताच ते संपून जाते. त्याचप्रमाणे संसार कितीही सुख-सुविधा, संपत्ती आणि वैभवाने भरलेला असला तरी डोळे मिटताच सर्व काही संपून जाते,’ असे विचार गुजरातहून बेळगावला सत्संगासाठी आलेल्या आचार्य राजरक्षित सुरजी यांनी शनिवारी बोलताना व्यक्त केले.

श्री संभावनाथ जिनालय सदाशिवनगर येथे त्यांचे प्रवचन संपन्न झाले.
आपल्या प्रवचनात ते पुढे म्हणाले की, “जोपर्यंत शरीरात आत्मा असतो, तोपर्यंत रुग्णालय, डॉक्टर, औषधे आणि उपचारांसाठी धावपळ सुरू असते. परंतु जसा आत्मा शरीरातून निघून जातो, तसा कोणतेही रुग्णालय त्या शरीराला ठेवून घेत नाही. घरात किंवा कार्यालयातही त्याला स्थान मिळत नाही. कोणी त्याला स्पर्श करण्यासही तयार नसते. सर्वजण एकच विचारत असतात की त्याला अंतिम यात्रेसाठी कधी घेऊन जाणार?”

‘थोडक्यात सांगायचे तर, गाडी गॅरेजमध्ये राहते, दागिने लॉकरमध्ये राहतात, पैसे बँकेत राहतात, पत्नी गल्लीच्या वळणापर्यंत सोबत येते, नातेवाईक स्मशानापर्यंत सोबत येतात, शरीर चितेपर्यंत जाते आणि आत्मा परलोकाच्या प्रवासाला निघून जातो.”

” सत्ता, संपत्ती आणि सौंदर्याचा कधीही अहंकार करू नये. आज रावणाच्या सुवर्णमयी लंकेचा काहीही ठावठिकाणा नाही. सिकंदराची कबर कुठेच दिसत नाही. रूपाचा गर्व असलेली वासवदत्ता देखील शेवटी राखेचा ढीग बनली. अहंकार हा पतनाचा अग्रदूत आहे.
यावेळी बोलताना पंन्यास त्रिभुवनरत्न विजयजी म्हणाले की, “लहानसा धर्मही जर भावपूर्वक केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो. संसारातील सर्व क्रिया पापबंधन करणाऱ्या आहेत आणि त्यामध्ये आपला भाव व रस खूप असतो. धर्मक्रिया पुण्यबंधन करणाऱ्या आहेत, पण त्यामध्ये आपला भाव कमी असतो. आता संसारातील पापकर्मे भावाशिवाय करा आणि धर्मक्रिया पूर्ण भावनेने करा. त्यामुळे आत्म्याचा अत्यंत लाभ होईल.”
शेकडो श्रावक-श्राविकांनी धर्मप्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचनानंतर दावणगिरीला निघण्यासाठी त्यांनी आपल्या संघासोबत प्रयाण केले.

About Belgaum Varta

Check Also

रोहित पवारांच्या आमरण उपोषणाला बेळगावातून जाहीर पाठिंबा; शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षाला बळ

Spread the love  बेळगाव : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी पंढरपूर येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *