Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीतील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे

Spread the love

 

दीर्घकालीन जलनियोजन आवश्यक; माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांची मागणी

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा कसा करता येईल, तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक पाणीसाठा कसा निर्माण करता येईल, यासाठी जलव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करून व्यापक विचारमंथन करण्याची गरज आहे, असे आवाहन निपाणी नागरिकांतर्फे नगरपालिकेचे माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
पत्रकातील माहिती अशी, शहरातील लोकसंख्येचा विचार करता आगामी ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजन करण्यात यावे. यासाठी नवीन तलावांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांचा विस्तार आणि राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध जलसंधारण प्रकल्पांचा सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
विशेषतः जवाहरलाल जलाशयातील पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून, शहराला भविष्यात पुरेसा व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. तलावातील पाणीसाठा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित भगीरथ प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
पाणी हे निसर्गाचे वरदान आहे. पाणी प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. त्यामुळे त्याचा जपून वापर केला पाहिजे. पाणी हा सध्या अत्यंत ज्वलंत प्रश्नअसून त्याच्या निराकरणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पाणी वापरणे हा जसा प्रत्येकाचा हक्क आहे, तसाच पाणी वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
सध्या अनेक ठिकाणी नळाला मुबलक पाणी येत असल्यामुळे अंगण धुणे, सडा रांगोळी, शौचालये व स्नानगृहे स्वच्छ करण्यासाठी पाईपद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवले जात आहे. याशिवाय वाहने धुणे किंवा इतर कारणांसाठी पाण्याचा होणारा गैरवापर तातडीने टाळला पाहिजे. पाणी हेच जीवन आहे हे लक्षात ठेवून नागरिकांनी पाणी संवर्धनासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा.
निपाणीतील या गंभीर पाणी प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून गांभीर्याने पाहावे आणि ठोस व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समस्त नागरिकांच्या वतीने प्रा. राजन चिकोडे यांनी शेवटी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *