Sunday , September 20 2026
Breaking News

पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून मुमेवाडीतील महिला शेतकऱ्यांचा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार

Spread the love

 

मुमेवाडी : दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध गावे घडविण्याच्या उद्देशाने अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाचा सकारात्मक परिणाम आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे दिसून येत आहे. येथील जय किसान महिला शेतकरी गटातील महिलांनी यंदा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार केला आहे.

पाणी फाउंडेशनच्या टीमने मुमेवाडी येथील जय किसान महिला शेतकरी गटाच्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष शिवारात पाहणी करून महिलांना आधुनिक, सेंद्रिय आणि शाश्वत शेतीबाबत मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशनने या महिला शेतकरी गटाची निवड करून सोयाबीन पिकासाठी विशेष प्रशिक्षण सुरू केले आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन, प्रत्यक्ष शिवार भेटी, सेंद्रिय खत व नैसर्गिक कीटकनाशकांची निर्मिती, पेरणीची योग्य वेळ, पाण्याचा काटेकोर वापर आणि हवामानानुसार पीक नियोजन अशा विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सामूहिक पद्धतीने बियाणे खरेदी केल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होत आहे. तसेच गोमूत्र, शेण, गूळ आणि पालापाचोळ्यापासून कमी खर्चात सेंद्रिय खत व नैसर्गिक कीटकनाशके तयार केली जात आहेत.

गटातील महिलांनी एकमेकींच्या शेतात मशागत आणि भांगलणीची कामे सामूहिकरीत्या केल्यामुळे मजुरीचा खर्चही कमी झाला असून महिलांमधील एकी अधिक बळकट झाली आहे. पाण्याचे नियोजन, हवामानानुसार शेतीचे नियोजन आणि तांत्रिक अडचणी व्हिडिओच्या माध्यमातून तज्ज्ञांपर्यंत पोहोचवून त्वरित मार्गदर्शन मिळत असल्याने यंदाचे सोयाबीन पीक अधिक चांगले आले असल्याचे महिलांनी सांगितले.

यावेळी जय किसान महिला शेतकरी गटाच्या सीआरपी संध्या कांबळे, निमंत्रक रुचिता पाटील, अध्यक्ष संगीता इंगळे यांच्यासह गटातील सर्व सदस्या उपस्थित होत्या. विभागीय समन्वयक प्रशांत गवंडी, शेती अधिकारी संजना मदने, अभिषेक सुतार, उमेद कर्मचारी बीएम, एमआयएस, फार्मर कप मेंटर सोनाली परीट तसेच पाणी फाउंडेशनच्या मीडिया टीमने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

मुमेवाडी येथील बळीराजा शेतकरी गटालाही पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शन मिळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

मलिग्रे येथील तरुण डॉक्टरचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

Spread the love  सांगली कोल्हापूर महामार्गावरील तावडे हॉटेल नजिक अपघात नेसरी (संजय धनके) : आजरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *