

आजरा : मुमेवाडी (ता. आजरा) येथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना ओळखपत्र व तिरंगा बॅचचे वाटप करण्यात आले, तर वारकरी व ग्रामस्थांच्या सहभागातून दिंडी व दहीहंडी सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यासोबतच बळीराजा महिला शेतकरी गटाने स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपली.
प्राथमिक विद्यामंदिर शाळेत आयोजित कार्यक्रमात रामदास लक्ष्मण साठे यांनी आपल्या वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप केले. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी शैलेंद्र मादयाळकर यांनी विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच भेट दिले. कार्यक्रमाचे स्वागत एल. एस. पाटील मॅडम यांनी केले, तर पी. के. पाटील यांनी आभार मानले.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारी करून परतलेल्या वारकरी, ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सहभागातून गावात दिंडी काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशात पालक व शिक्षकांसह दिंडीत सहभागी झाले. श्री भावेश्वरी मंदिरात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे उभारले, पारंपरिक फुगड्या खेळल्या तसेच श्लोक व अभंग सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले.
दरम्यान, गावातील बळीराजा महिला शेतकरी गटाच्या सदस्यांनी अंगणवाडी परिसराची स्वच्छता करून तणनाशक औषधांची फवारणी केली. या उपक्रमात गटाच्या अध्यक्षा सरस्वती पाटील, निमंत्रक वर्षा भिउंगडे, कृषी सहाय्यक छाया गुरव यांच्यासह महिला सदस्यांनी सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta