Monday , August 17 2026
Breaking News

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love

 

महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव

बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महांतेश नगर येथे रविवारी एका ७५ वर्षीय वृद्धावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याने त्यांच्या पायासह मांडीला सात-आठ वेळा चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी झालेल्या वृद्धावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

महांतेश नगर येथील अब्दुल सत्तार बुड्डनावर (वय ७५) हे सलूनमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. रस्त्यावरून जात असताना एका भटक्या कुत्र्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे ते रस्त्यावर कोसळले. त्यानंतरही कुत्र्याने त्यांचा पाठलाग करत पाय आणि मांडीवर सात-आठ वेळा चावा घेतला.

विशेष म्हणजे, हल्ल्याच्या वेळी परिसरात मदतीसाठी कोणीही जवळ नसल्याने काही काळ कुत्रा वृद्धावर हल्ला करत राहिला. या संपूर्ण घटनेचे दृश्य जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

दरम्यान, काही वेळाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावत वृद्धाची सुटका केली. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्यानंतर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुड्डनावर हे हृदयरुग्ण असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कुत्र्यांच्या हल्ल्यांनी नागरिकांमध्ये भीती

बेळगाव शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, वारंवार नागरिकांवर हल्ले होत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महांतेश नगरमधील या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका व संबंधित प्रशासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता तातडीने ठोस आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

About Belgaum Varta

Check Also

नागपंचमी दिवशीच विषारी सापाचा दंश; रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा मृत्यू

Spread the love  रायबाग : शेतात कचरा काढण्याचे काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *