


पाणीपुरवठा सुरळीत होण्याची आशा
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव शहराची तहान भागवणारा राकसकोप जलाशय अखेर बुधवारी ओव्हरफ्लो झाला. यामुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात दूर होण्याची चिन्हे असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे राकसकोप जलाशयाची पाणीपातळी चिंताजनकरीत्या घटली होती. जलाशयाने तळ गाठल्याने बेळगाव शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. त्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्यात येत होता.
मात्र जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्यानंतर जलाशयातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत गेली. आठ दिवसांपूर्वी जलाशय पूर्ण भरण्यासाठी सुमारे दहा फूट पाण्याची आवश्यकता होती. सोमवारीही दोन फूट पाण्याची गरज होती. परंतु जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आणि अखेर बुधवारी राकसकोप जलाशय ओव्हरफ्लो झाला.
राकसकोप जलाशयावरच बेळगाव शहराचा मुख्य पाणीपुरवठा अवलंबून आहे. गतवर्षी जलाशय लवकर भरला होता, मात्र यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने जुलै अखेरीस जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे.
जलाशय भरल्याने शहरातील पाणीपुरवठा लवकरच नियमित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सध्या आठ ते दहा दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आता अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta