Sunday , September 20 2026
Breaking News

एकाच वेळी सुरू असलेल्या पडताळणी मोहिमांमुळे नागरिकांचा गोंधळ; फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी सध्या जिल्हाभर वेगाने सुरू आहे. बीपीएल रेशन कार्ड ई-केवायसी, विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) आणि गृहज्योती योजनेची पुनर्पडताळणी या तिन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

सध्या विविध ठिकाणी या योजनांसाठी नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया सुरू असून, पुढील टप्प्यात गृहलक्ष्मी योजनेसाठीही ई-केवायसी व पुनर्पडताळणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच गृहलक्ष्मी योजनेच्या ई-केवायसीसाठी कोणतेही अधिकृत संकेतस्थळही सुरू करण्यात आलेले नाही.

दरम्यान, या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी गृहलक्ष्मी ई-केवायसीच्या नावाखाली महिलांकडून ₹100 ते ₹200 पर्यंत रक्कम उकळून फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून अनेक महिला तासन्तास रांगेत उभ्या राहत असून, अशा फसवणुकीला बळी पडत आहेत.

सध्या बीपीएल रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी मोहीम सुरू असून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य आहे. एसआयआर प्रक्रियेसाठी मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती किंवा पत्ता बदल करण्यासाठी अर्ज, आधार कार्ड आणि छायाचित्र आवश्यक आहे. तर गृहज्योती योजनेच्या पुनर्पडताळणीसाठी वीज ग्राहक क्रमांक, आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच आवश्यक असल्यास वीज बिलाची प्रत सादर करावी लागत आहे.

एकाच वेळी विविध योजनांच्या पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिक, विशेषतः महिलावर्ग, सर्व कागदपत्रे घेऊन विविध केंद्रांवर पोहोचत आहे. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असून प्रशासनाने प्रत्येक योजनेसंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *