Sunday , June 14 2026
Breaking News

रोहित पवारांच्या आमरण उपोषणाला बेळगावातून जाहीर पाठिंबा; शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षाला बळ

Spread the love

 

बेळगाव : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला बेळगावातूनही जोरदार पाठिंबा मिळाला आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई यांनी पंढरपूर येथे जाऊन रोहित पवार यांची भेट घेत आंदोलनाला जाहीर समर्थन दर्शविले.

यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधणारे निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकरी अवर्षण, निसर्गाची अवकृपा, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक संकटामुळे गंभीर अडचणीत सापडल्याचे नमूद करत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात रोहित पवार यांचे उपोषण हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले लोकहिताचे आंदोलन असल्याचे नमूद करण्यात आले. शेतकरी प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेली भूमिका काळाची गरज असून ती दिशादर्शक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

श्रीराम सेना हिंदुस्थान, महाराष्ट्र एकीकरण समिती (बेळगाव) आणि कृतिशील मराठा समाज या संघटनांनी संयुक्तपणे या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत पाठिंबा जाहीर केला. मराठी बांधवांच्या भावना आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून आम्ही या संघर्षात सहभागी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील आणि केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला बेळगावातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे रोहित पवार यांच्या उपोषणाला अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

यावेळी विजय बाडीवाले, राजेंद्र बैलूर आणि विनोद बिर्जे यांचीही उपस्थिती होती.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट

Spread the love  कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *