Thursday , August 20 2026
Breaking News

आंतर क्लब स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावले

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित धारवाड विभागीय 19 वर्षांखालील मुलांच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धा 2026-27 मध्ये बेळगाव स्पोर्ट्स क्लब (अ) संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात हुबळी क्रिकेट अकॅडमी (अ) संघाचा 5 गडी राखून पराभव करत बेळगावच्या युवा क्रिकेटपटूंनी आपली ताकद सिद्ध केली.

बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी आणि कारवार जिल्ह्यांतील संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली होती. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हुबळी क्रिकेट अकॅडमीचा डाव 31 षटकांत 98 धावांवर आटोपला. समृद्ध बगुनावर याने 34, तर पवन शिल्लेद याने 14 धावांचे योगदान दिले.

बेळगाव स्पोर्ट्स क्लबकडून सोहम बी. पाटील याने भेदक गोलंदाजी करत 35 धावांत 4 बळी घेतले. पृथ्वी कांबळेने 3, तर लक्ष्य खतायत, सागर पाटील आणि सुरेंद्र पाटील यांनी प्रत्येकी 1 बळी घेत हुबळीचा डाव स्वस्तात गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

99 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 22.2 षटकांत 5 गडी गमावत विजय मिळवला. सलामीवीर आशुतोष डी. हिरेमठ याने 44 चेंडूत 41 धावांची संयमी खेळी केली, तर अर्णव कुंदप याने 34 धावांचे योगदान देत संघाच्या विजयाचा पाया रचला. हुबळीकडून आरव ओसवाल याने 4 बळी घेत झुंजार प्रयत्न केला.

संपूर्ण स्पर्धेतही बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. व्रतीन पडती याने सर्वाधिक 316 धावा फटकावत फलंदाजीत आपला ठसा उमटवला. अर्णव कुंदप (260 धावा) आणि आशुतोष हिरेमठ (210 धावा) यांनीही संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले. गोलंदाजीत सोहम पाटील याने सर्वाधिक 23 बळी घेत स्पर्धेतील आघाडीचा गोलंदाज ठरला. सुरेंद्र पाटील (14 बळी) आणि पृथ्वी कांबळे (9 बळी) यांनीही प्रभावी गोलंदाजी केली.

संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. प्रशिक्षक बाळकृष्ण पाटील, विजय पाटील आणि सोमनाथ सोमणाचे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

धारवाड विभागीय स्पर्धेतील या विजेतेपदामुळे बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या युवा क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर चमक दाखविण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणानिमित्त बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांना आजपासून सुरुवात

Spread the love  बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांसह प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी नैऋत्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *