Thursday , August 20 2026
Breaking News

विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे : अजय कांडर

Spread the love

 

बेळगाव : “जेव्हा कविता मरते, तेव्हा भाषा मरते आणि भाषा संपली की संस्कृतीही नष्ट होते. भाषा जिवंत ठेवण्याचे सामर्थ्य कवितेत आहे. त्यामुळे कवितेतून वैश्विक विचार व्यक्त होणे आवश्यक असून विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले.

शब्दगंध कविमंडळ, बेळगाव यांच्या वतीने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने रविवारी मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात आयोजित काव्यलेखन कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविमंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष सुभाष ओउळकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. अशोक अलगोंडी यांनी केले, तर बसवंत शहापूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उद्घाटनपर भाषणात सुभाष ओउळकर यांनी साहित्य-संस्कृती जतन करण्यासाठी अशा कार्यशाळांची आवश्यकता अधोरेखित केली.

मार्गदर्शन करताना अजय कांडर म्हणाले, “आतून उमटणारा हुंकार म्हणजे कविता. विचारांशी बांधिलकी असेल, तरच अर्थपूर्ण कविता जन्म घेते. सातत्याने लेखन केल्याने स्वतःची चिकित्सा करता येते. कवीने स्वतःशी सतत संवाद साधला पाहिजे. त्यातूनच दर्जेदार कविता निर्माण होण्यासाठी आवश्यक वातावरण तयार होते. कवितेची समज अधिक व्यापक करण्यासाठी काव्यलेखन कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.”

यानंतर सुधाकर गावडे आणि उर्मिला शहा यांनी घेतलेल्या मुलाखतीतून अजय कांडर यांनी उपस्थित कवी व साहित्यप्रेमींना मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ कवी विजय चोरमारे म्हणाले, “कविता म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा नव्हे; ती जीवनानुभवांची प्रामाणिक अभिव्यक्ती आहे. कविता लिहिणे ही एक जोखीम आहे. आपण जे पाहतो, अनुभवतो आणि जगतो, ते कवितेत उतरले पाहिजे. कवितेतून मूल्यांची जपणूक आणि आशयाची समृद्धी आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले, “जन्मापासून कविता आपल्या जगण्याचा भाग असते. त्यामुळे कविता आणि जीवन यांचे नाते अतूट आहे. चांगली कविता घडण्यासाठी प्रथम चांगले वाचन आवश्यक आहे. कविता लयीत नसून आशयात श्रेष्ठ ठरते. कवीने स्वतःच्या लेखनाचा स्वतःच समीक्षक व्हावे. केवळ टाळ्या मिळविण्यासाठी नव्हे, तर समाजाला विचार देणारी कलाकृती म्हणून कविता लिहिण्याचे भान प्रत्येक कवीने जपले पाहिजे.”

कार्यशाळेस प्रा. सुभाष सुंठणकर, प्राचार्य आनंद मेणसे, किशोर काकडे, विलास बेळगावकर, लेखक विलास माळी, कणकवलीचे कवी सत्यवान साटम, निशिगंधा गावकर, रेखा गद्रे, जितेंद्र रेडेकर, स्मिता किल्लेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कवी, साहित्य अभ्यासक आणि रसिक उपस्थित होते. कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ किरमटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अस्मिता आळतेकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

हिंडलगा कारागृहात वेश्याव्यवसाय आणि अवैध धंदे; तरुणाकडून पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *