Thursday , August 20 2026
Breaking News

वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली; पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी

Spread the love

 

बेळगाव : सोमवारी (दि. २९) साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी लगबग पाहायला मिळाली. रविवारची सुटी असल्याने सकाळपासूनच पूजासाहित्य, फुले, फळे आणि वाण खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.

वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून उपवास करण्याची परंपरा असल्याने पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच दुकाने आणि फेरीवाल्यांकडे गर्दी केली.

बेळगावच्या परंपरेनुसार पूजेसाठी दोन किंवा पाच हिरव्या बांगड्या, हळद-कुंकू, अक्षता, पूजेचा दोरा, काळेमणी, कंगवा, आरसा, बिंदी, हळद-कुंकवाचा डबा आदींचा समावेश असलेले वाण २० ते २५ रुपयांत उपलब्ध होते. याशिवाय फणसाचे गरे, करवंदे, जांभळे, धामणे, केळी, आंबे आदी फळांनाही चांगली मागणी होती.

गजरे, हार, फुलांच्या माळा यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. बदलत्या जीवनशैलीनुसार घरीच पूजा करता यावी यासाठी वटवृक्षाची लहान रोपेही विक्रीसाठी उपलब्ध होती आणि त्यांनाही महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

दुपारनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली तरी खरेदीचा उत्साह कमी झाला नाही. पावसाची पर्वा न करता महिलांनी पूजासाहित्याची खरेदी सुरूच ठेवली. त्यामुळे दिवसभर शहरातील बाजारपेठा वटपौर्णिमेच्या उत्साहाने गजबजून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणानिमित्त बंगळूर-बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांना आजपासून सुरुवात

Spread the love  बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांसह प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी नैऋत्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *