Tuesday , August 18 2026
Breaking News

आंबोलीतील महादेव गड पॉईंटवरून 600 फूट दरीत कोसळून निपाणीतील डॉक्टरांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील महादेव गड पॉईंटवरून सुमारे 600 फूट खोल दरीत कोसळून निपाणीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. आयुब सय्यद (वय 45, रा. जत्राट, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर बुधवारी सकाळी सुमारे साडेतीन तासांच्या अथक रेस्क्यू मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास डॉ. सय्यद आपल्या मित्रांसह आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. विविध पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर सर्वजण महादेव गड पॉईंटवर गेले. त्यावेळी डॉ. सय्यद रेलिंग ओलांडून दरीच्या बाजूने खाली उतरू लागले. मात्र पाय घसरल्याने ते थेट सुमारे 600 फूट खोल दरीत कोसळले. ही घटना तेथे कणसे विकणाऱ्या विक्रेत्यांनी पाहिली आणि त्यांनी तातडीने त्यांच्या मित्रांना तसेच पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश परब यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र दाट धुके, अंधार आणि दरीतील कठीण परिस्थितीमुळे मंगळवारी रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली.

बुधवारी सकाळी सात वाजता पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम, आंबोली–सांगेली यांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे साडेतीन तासांनी डॉ. सय्यद यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.

या घटनेची माहिती मिळताच जत्राट येथून मोठ्या संख्येने नातेवाईक आणि नागरिक आंबोली येथे दाखल झाले. डॉ. आयुब सय्यद हे वैद्यकीय सेवेसोबतच क्रिकेटप्रेमी म्हणूनही परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, डॉ. सय्यद यांच्यासोबत चालक सुनील सदाशिवराव पाटील, दीपक पठारे, किशोर तावदारे, राजेंद्र कोकणे, शिवानंद धारकोड, अजित पठारे, सुकुमार कुन्नुरे, संतोष फटिंग, संतोष पाटील यांच्यासह एकूण दहा जण पर्यटनासाठी आंबोली येथे आले होते. या दुर्घटनेमुळे जत्राट व निपाणी परिसरात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *