

कागवाड : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथील मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृतिदिन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धांमध्ये सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या साहित्यिक आणि वक्तृत्व कौशल्याची प्रभावी छाप पाडली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मराठी विभाग प्रमुख तथा शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, प्रो. बी. डी. दामन्नावर, डॉ. आनंदकुमार जक्कन्नावर, प्रा. मनोज कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तळवार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक आशय आणि संघर्षमय जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण केले. त्यांच्या साहित्यामधून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाचे वास्तव प्रभावीपणे व्यक्त झाले असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून सामाजिक जाण अधिक समृद्ध करावी, असे त्यांनी सांगितले.
पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या वाचनसेवेचा गौरव करताना त्यांनी वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. दुर्मीळ ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करून त्यांनी समाजाला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि प्रभावी अभिव्यक्तीची सवय जोपासल्यास व्यक्तिमत्त्व विकासास मोठी चालना मिळेल, असे ते म्हणाले.
त्यानंतर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. विविध सामाजिक, साहित्यिक आणि समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत विचार मांडत परीक्षकांची दाद मिळवली. स्पर्धकांच्या भाषेवरील प्रभुत्व, आशयाची समृद्धता आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे स्पर्धांचा दर्जा उंचावल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी आणि डॉ. अमोल पाटील यांनी केले. त्यांनी स्पर्धकांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभाग, शब्दगंध कवी मंडळ संघ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. साहित्य, वक्तृत्व आणि वाचनसंस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
Belgaum Varta Belgaum Varta