

भरतीतील भ्रष्टाचाराचा आरोप; गृहमंत्री व केईए अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
बेळगाव : कर्नाटकातील विविध सरकारी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, ओएमआर शीट टॅम्परिंग आणि भरती प्रक्रियेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)च्या वतीने बुधवारी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (केईए) विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
सरकारी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असून गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप एबीव्हीपीने केला. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
केपीएससीमार्फत होणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेत ७० ते ८० लाख रुपयांपर्यंत लाच घेतली जात असल्याचा गंभीर आरोप एबीव्हीपीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना पदे विकली जात असून पात्र व गरीब विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
तसेच पोलिस कॉन्स्टेबल (पीसी) भरती परीक्षेत प्रश्नपत्रिकांच्या क्रमांकातील गोंधळ व तांत्रिक त्रुटींमुळे १२९ विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला. जुलै महिन्यात जाहीर झालेल्या सुमारे ४०० पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या निकालातही मोठा घोटाळा झाल्याचा दावा आंदोलकांनी केला.
३ जुलै रोजी झालेल्या पीसी भरती परीक्षेदरम्यान तिकोटा परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना तब्बल अर्धा तास उशिराने प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने त्यांचा मानसिक छळ झाल्याचा आरोपही करण्यात आला. राज्यात ओएमआर शीट टॅम्परिंगसारखे गंभीर प्रकार घडत असतानाही दोषींवर कारवाई होत नसल्याने कायद्याचा धाक उरलेला नसल्याची टीका आंदोलकांनी केली.
भरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचे (केईए) अध्यक्ष यांनी तातडीने आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी एबीव्हीपीने केली. तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यातील सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या आंदोलनात एबीव्हीपीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. राणी चन्नम्मा चौक परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta