

११ ऑगस्टपासून यात्रा समाप्तीपर्यंत वडगाव हद्दीत नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा
बेळगाव : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव येथील श्री मंगाई देवी यात्रेला ११ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. यात्रा शांततेत, सुरळीत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यात्रा कालावधीत मंदिर परिसरासह संपूर्ण वडगाव हद्दीत पशु व पक्ष्यांच्या बळीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ११ ऑगस्टपासून यात्रा समाप्त होईपर्यंत मंदिर परिसरात तसेच वडगावच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा पशु अथवा पक्ष्यांचा बळी देण्यास परवानगी राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
श्री मंगाई देवी यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने सार्वजनिक शांतता, आरोग्य, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक पशुबळी प्रतिबंध अधिनियम, १९५९, त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले १९६३ चे नियम तसेच १९७५ च्या सुधारित तरतुदींनुसार मंदिरांमध्ये देवाच्या नावाने पशु किंवा पक्ष्यांचा बळी देण्यास कायद्याने बंदी आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीच हा आदेश जारी करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे आणि धार्मिक उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून यात्रेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta