Sunday , August 16 2026
Breaking News

मंगाई देवीच्या जयघोषाने दुमदुमली अळवण गल्ली

Spread the love

 

शहापूरमध्ये यात्रेचा उत्साह शिगेला; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, भव्य महाआरतीने सांगता

शहापूर : ‘मंगाई देवीच्या जयघोषाने’ दुमदुमलेला परिसर, भक्तिभावाने फुललेले वातावरण आणि दर्शनासाठी उसळलेली भाविकांची गर्दी… अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात शहापूर अळवण गल्ली येथील जागृत देवस्थान श्री मंगाई देवीची वार्षिक यात्रा शुक्रवारी (दि. ७) मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त संपूर्ण अळवण गल्लीला जणू भक्तीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

यात्रेच्या मुख्य धार्मिक कार्यक्रमाला सकाळी पंचमंडळींच्या हस्ते विधिवत गाऱ्हाणे उतरवून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर देवीची पूजा व आरती पार पडली. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू होती. परिसरातील तसेच शहापूर शहरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.

यात्रेनिमित्त अळवण गल्लीला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. रात्रीच्या वेळी रोषणाईने उजळून निघालेला परिसर आणि मंदिरातील भक्तिमय वातावरण यात्रेचे आकर्षण ठरले. ठिकठिकाणी देवीचा जयघोष आणि धार्मिक वातावरणामुळे यात्रेचा उत्साह अधिकच वाढला होता.

यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अळवण गल्लीतील नागरिक, महिला आणि युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रेच्या व्यवस्थेत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

यावेळी अळवण गल्लीतील पंच सूरज कुडूचकर, संजीव कांगळे, रवी हैबत्ती, संजय मुतरगेकर, बाळू कदम, देवेंद्र पाटील आणि दीपक अडकूरकर यांच्यासह गल्लीतील नागरिक, महिला व युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरतीने भक्तीचा जल्लोष

सायंकाळी झालेल्या भव्य महाआरतीने यात्रेच्या उत्साहाला कळस गाठला. महाआरतीच्या वेळी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेत देवीचा जयघोष केला. यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम घडवून आणणारी श्री मंगाई देवीची यंदाची यात्रा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरली.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *