
बेळगांव : के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालय (स्वायत्त), बेळगावी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील जिमखाना, असोसिएशन व क्लब उपक्रमांचा शुभारंभ महाविद्यालयाच्या केंद्रिय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमातून शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा तसेच विस्तार उपक्रमांच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बेळगाव महानगरपालिकेचे महसूल उपआयुक्त, डॉ. सिद्धू हुल्लोळी हे लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात कु. अक्षय पाटील यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर लिंगराज पदवी पूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती गिरिजा हिरेमठ यांनी उपस्थितांचे स्वागत करून त्यांनी जिमखाना, असोसिएशन व क्लब उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सर्जनशीलता, सांघिक भावना आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रा. सारिका नगरे यांनी प्रमुख पाहुणे डॉ. सिद्धू हुल्लोळी यांचा परिचय करून देत शिक्षण व विद्यार्थी विकास क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमनी यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उपक्रमांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांना उद्देशपूर्ण, शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवन जगावे. सतत गतिमान राहणे हेच यशाचे रहस्य आहे. आजच्या युगात विद्यार्थ्यांना सातत्याने प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांच्या माध्यमातून कोणतीही अडचण पार करता येते, असे त्यांनी नमूद केले. यशाचा पाया म्हणजे शिस्त असून, प्रतिभेसोबत चिकाटी, समर्पण आणि नैतिक मूल्ये जोपासण्याची आवश्यकता आहे.
यावेळी मागील शैक्षणिक वर्षात शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुणे आणि उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमणी यांनी विद्यार्थ्यांनी जिमखाना, असोसिएशन व क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. वर्गातील शिक्षणाबरोबरच अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी विकसित होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लिंगराज महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सी. रामाराव यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सिद्धनगौडा पाटील आणि श्रीमती निकिता बेडरे यांनी प्रभावीपणे केले. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी आणी प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta